नवरात्रोत्सवाच्या उत्साहाला उधाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नवरात्रोत्सवाच्या उत्साहाला उधाण
नवरात्रोत्सवाच्या उत्साहाला उधाण

नवरात्रोत्सवाच्या उत्साहाला उधाण

sakal_logo
By

नेरूळ, ता. २५ (बातमीदार) ः नवरात्रोत्सवाला आजपासून सुरुवात झाल्याने बाजारपेठांमध्ये उत्साह संचारला आहे. नवी मुंबईतील वाशी, नेरूळ, घणसोली, कोपरखैरणे परिसरात आदिशक्तीच्या आगमनाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून साहित्य खरेदी करण्यासाठी होत असलेल्या गर्दीमुळे सर्वत्र उत्साह संचारला आहे.
नेरूळ सेक्टर १० मधील गावदेवी मैदानात बाजारपेठ नवरात्रीसाठी सजली आहे. निर्बंधमुक्त वातावरणात साजरा करण्यात येणाऱ्या आदिशक्तीच्या जागरासाठी भाविकांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. बाजारात घटस्थापनेसाठी आवश्यक असणारी मडकी, घट, मुकुट, फेटे, दागदागिने, मंदिर, तोरण, झालर, परडी, नाडा, आकर्षक झुंबर असे विविध साहित्य खरेदी करण्याकडे महिलांचे प्राधान्य होते. पितृपंधरवडा झाल्यानंतर नवरात्रोत्सव साजरी होत घरोघरी घटस्थापना करण्यासाठी लागणाऱ्या वस्तूंची विक्री केली जाते. त्यात पूजेसाठी लागणारे खण-साडी, बांगडी-ओटी, तसेच घटाच्या पूजेसाठी पत्रावळीही बाजारात विक्रीसाठी दाखल होत असून विविध फळांसह त्यांची विक्री होत आहे.
----------------------------------------
खरेदीसाठी महिला वर्गाची लगबग
महिलांची खरेदीसाठी बाजारात लगबग सुरू आहे. देवीच्या मूर्तीला प्रत्येक वारानुसार नऊ दिवस नऊ रंगांच्या साड्या नेसवल्या जातात. या नवरंगांचे अनुकरण महिलाही साड्या, ड्रेस घालून करतात. त्यामुळे महिला नवरंगातील साड्या व ड्रेस हमखास खरेदी करतात. त्याचबरोबर वेगवेगळ्या साड्यांवर वेगवेगळे दागिने, वेण्या, हार यांची दुकाने मार्केटमध्ये लागली आहेत.
--------------------------------------------
पूजेसाठी लागणाऱ्या साहित्याला मागणी
लाल घट बाजारात ७० रुपयाला मिळत आहे, तर काळा घट ४० रुपयांपर्यंत आहे. त्यासाठी लागणारी परडी ५० रुपयांना मिळत आहे. पूजेसाठी लागणारे लाल कापड ६० रुपयांना आहेत. तसेच हळद, कुंकू, कापूर, अगरबत्ती, गुलाल, धूपकांडी ही बाजारात उपलब्ध आहे. मंदिरामध्ये देवीपुढे दिवा लावण्यासाठी वाती १५ रुपयांना आहेत. नारळ २० ते ३५ रुपयांना आहे. मोठी परडी १५० ते २०० रुपयाला आहे, तर मंडपी ४० रुपयाला आहे. देवीचे गार पाकीट ४० ते ८० रुपये, तसेच देवीच्या पूजेसाठी लागणारी ऊददाणीही बाजारात आहेत.
---------------------------
नवरात्रोत्सवानिमित्त यंदा बाजारात ग्राहकांची गर्दी आहे. यावर्षी निर्बंधमुक्त सण साजरा होत असल्यामुळे विक्रेत्यांनाही सुगीचे दिवस आले आहेत. महिलांनी वस्तू खरेदीसाठी गर्दी केली आहे.
- कावेरी लाड, विक्रेते
------------------------------------
पूजेसाठी लागणाऱ्या वस्तूंचे विविध पर्याय बाजारात मिळत आहेत. तसेच देवीच्या आगमनासाठीची जय्यत तयारी केली जात असून आज शेवटचा रविवार असल्याने खरेदी अंतिम टप्प्यात आली आहे.
- शैला डोके, ग्राहक