
हुल्लडबाजांवर दामिनीची नजर
ठाणे, ता. २५ (वार्ताहर) : महामारीनंतर आणि राज्यात बदललेल्या राजकीय परिस्थितीनंतर यंदा ठाण्यात नवरात्रोत्सवाची धूम राहणार आहे. अनेक पक्ष आणि नेते हे देवीच्या दर्शनासाठी भेटी देणार आहेत. त्या अनुषंगाने ठाणे पोलिस दल सतर्क आणि सज्ज झालेले आहे. कुठलाही अनुचित प्रकार न घडता, कायदा आणि सुव्यवस्था चोख ठेवण्यासाठी ठाणे पोलिसांनी जय्यत तयारी केलेली आहे. यासोबतच नवरात्रोत्सवात आयोजित होणाऱ्या गरबा-दांडियावर करडी नजर ठेवण्यासाठी महिला पोलिसांचे दामिनी पथक तैनात राहणार आहे. मुलींची छेड काढणाऱ्या किंवा हुल्लडबाजी करणाऱ्या रोडरोमिओंना या दामिनी पथकाच्या दुर्गावताराचा सामना करावा लागणार आहे.
ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत पाच परिमंडळात मोठ्या नवरात्रोत्सव मंडळाच्या जल्लोषावर पोलिसांचा वॉच राहणार आहे. यंदाच्या राजकीय परिस्थितीमुळे नवरात्री उत्सवाच्या नऊ दिवसांत पोलिसांचा खडा पहारा राहणार आहे. संवेदनशील ठिकाणी मात्र पोलिस अधिक लक्ष केंद्रित करणार आहेत. घटस्थापना ते माँ दुर्गेच्या विसर्जनापर्यंत ठाणे पोलिस खडा पहारा देणार आहेत. ठाणे पोलिसांचा हा बंदोबस्त २६ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर २०२२ पर्यंत राहणार आहे. आयुक्तालय क्षेत्रात टेंभीनाका येथील जय अंबे सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ आणि दुर्गाडी नवरात्रोत्सव मंडळ, कल्याण ही दोन मोठी मंडळे असून या ठिकाणी पोलिसांची करडी नजर आणि मोठ्या बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आलेले आहे.
चोरांवर लक्ष
नवरात्रोत्सव गरब्यासाठी दांडियामध्ये मोठ्या प्रमाणात तरुण-तरुणाई उतरते. यामध्ये गरबाप्रेमी महिलांचाही समावेश असतो. काही मंडळाच्या वतीने सिने कलाकारांनाही निमंत्रित करण्यात येते. या वेळी प्रेक्षकांचीही तुफान गर्दी उसळते. यामध्ये अपप्रवृत्तीचाही शिरकाव असतो. अशा घटनांना आवर घालण्यासाठी अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली परिमंडळ स्तरावरील विशेष महिला विविध गर्दीच्या मंडळात गस्त घालणार आहेत; तर दुसरीकडे महिला मोठ्या प्रमाणात दागिने घालून येतात. त्यामुळे अपप्रवृत्तीवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे. स्थानिक पोलिस ठाण्याचे दामिनी पथक अशा ठिकाणी गस्त घालणार आहेत. या पथकात एक महिला अधिकारी आणि कर्मचारी यांचा समावेश राहणार आहे.
-----------------------------------------------
असा राहणार बंदोबस्त
ठाणे पोलिस आयुक्त हद्दीतील पाच परिमंडळात बंदोबस्तासाठी २७०० पोलिस, ६०० अधिकारी आणि कर्मचारी यांचा समावेश राहणार आहे. एसआरपीच्या दोन तुकड्या तैनात असून तीन तुकड्यांची कुमक मागविण्यात आलेली आहे. यामध्ये ७०० होमगार्ड, १० पोलिस उपायुक्त, २० सहाय्यक पोलिस आयुक्त, १२० पोलिस निरीक्षक, सहायक पोलिस निरीक्षक आणि ३५० उपनिरीक्षक असणार आहेत. तसेच, २५ महिला अधिकारीही असल्याची माहिती विशेष शाखेचे सहायक पोलिस आयुक्त अनिल वाघमोरे यांनी दिली.