सण उत्सवांवर वारेमाप खर्च... समस्या गेल्यावर्षी प्रमाणेच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सण उत्सवांवर वारेमाप खर्च... समस्या गेल्यावर्षी प्रमाणेच
सण उत्सवांवर वारेमाप खर्च... समस्या गेल्यावर्षी प्रमाणेच

सण उत्सवांवर वारेमाप खर्च... समस्या गेल्यावर्षी प्रमाणेच

sakal_logo
By

शर्मिला वाळुंज : सकाळ वृत्तसेवा

डोंबिवली, ता. २५ ः ‘गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही...’ असेच काहीसे कल्याण डोंबिवली शहरातील समस्यांचे झाले आहे. मूलभूत समस्यांकडे नागरिकांचे फारसे लक्ष जाऊ नये म्हणून राजकीय पक्षांकडून विविध सण उत्सवांचे आयोजन केले जात आहे. गणेशोत्सवानंतर नवरात्रोत्सव सुरू झाला असून दांडिया उत्सव राजकीय पक्षांकडून आयोजित केले गेले आहेत. यासाठी शहरातील मैदाने सज्ज झाली असून रस्त्यांवर बॅनरबाजी, कमानी, विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी उत्सवांवर बक्कळ पैसा राजकीय पक्षांकडून खर्च केला जात असताना येथील समस्यांकडे थोडे पहाल का, अशी विचारणा नागरिक करू लागले आहेत.
वाहन कोंडी, अरुंद रस्ते, खड्डे पडून रस्त्यांची झालेली चाळण, कचरा, प्रदूषण, पाणीटंचाई यांसारख्या समस्यांना गेले कित्येक वर्षे कल्याण डोंबिवलीकर तोंड देत आहेत. रस्त्यांच्या कामावरून सध्या येथील राजकीय पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. आरोप-प्रत्यारोप करण्यात जेवढी तत्परता दाखविले जात आहे, तेवढी तत्परता समस्या सोडविण्यासाठी मात्र कोणाकडून दाखविली जात नाही. कोरोनामुक्तीनंतर शहरात सण उत्सव धूमधडाक्यात साजरे होऊ लागले आहेत. दहीहंडी, गणेशोत्सवानंतर आता नवरात्रोत्सव सुरू झाला आहे. यानिमित्त भव्य स्वरूपात गरब्याचे आयोजन पक्षांच्या वतीने करण्यात आले आहे. यावर लाखो रुपयांची उधळण करण्यात आली असल्याचे दिसते. आपल्या पक्षाची ताकद दाखविण्यासाठी रस्त्यांवर मोठमोठ्या कमानी बांधण्यात आल्या आहेत. बॅनरबाजी करण्यात आली आहे. या कमानी वाहतुकीला अडथळा ठरत आहेत. बॅनरबाजीमुळे शहर विद्रूप झाले आहे, याकडे मात्र डोळेझाक केली जात आहे. नवरात्रोत्सवानंतर दिवाळी येईल. राजकारणी प्रभागात उटणे, पणत्या, रांगोळी वाटतील आणि मतदारांना खूश करतील; परंतु समस्या काही सुटणार नाहीत. या समस्यांकडेही थोडे लक्ष द्या, अशी मागणी नागरिक करत आहेत.

भव्य उत्सव आयोजित करून मतदारांना खूश करणे, राजकीय टोलवाटोलवी करून मुख्य समस्येकडून त्यांचे लक्ष विचलित करणे, असाच खेळ सध्या कल्याण डोंबिवलीत सर्वपक्षीयांकडून सुरू असल्याचे दिसते. प्रशासकीय राजवट लागू असल्याने प्रशासकीय अधिकाऱ्यांवर तोफा डागत आपले हात वर करताना दिसतात. सण उत्सवांवर बक्कळ पैसा खर्च करण्याबरोबरच पायाभूत सुविधांकडेही लक्ष द्या, अशी सूचना नागरिक करू पाहात आहेत.
ज्येष्ठ दक्ष डोंबिवलीकर आणि विद्यानिकेतन शाळेचे संस्थापक विवेक पंडित याविषयी म्हणाले, शहरातील उत्सव, महोत्सव व अन्य कार्यक्रम हे लोकवर्गणी काढून किंवा स्थानिक पुढाऱ्यांकडून निधी घेऊन केले जात असावेत. समस्या सोडविण्यासाठी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या समस्या काही या पारंपरिक धार्मिक पूजनाने नाहीशा होणाऱ्या नाहीत, हे आपल्याला कधी उमजेल, असा सवाल त्यांनी केला. आजही, सर्वसाधारण माणूस सण, उत्सव याकडे जेवढा आकर्षिला जातो तेवढ्याच समस्या विसरतो. आपल्याकडे प्रशासनाला वठणीवर आणण्यासाठी मार्ग नाहीत, असे नाही. फक्त इच्छाशक्ती आणि वेळ नसतो. बहुतांश लोक हा नसणारा वेळ मॉल, विकेण्ड यामध्ये शोधतात. थोडक्यात डोंबिवली म्हणजे एक प्रकारे मोठी पेईंग गेस्ट टाईप वसाहत आहे आणि कोणालाही शहराप्रती आपले काही उत्तरदायित्व आहे, याची जाणीव नसल्याचे त्यांनी सांगितले.

कोट
वर्षानुवर्षे आपल्याकडे समस्या या जशाच्या तशा आहेत. रस्त्यांवर खड्डे असणारच याची लोकांना एवढी सवय झाली आहे की, देवगडचा आंबा म्हणजे हापूस असा पेटेंट केला गेला तसाच डोंबिवली म्हणजे खड्डे असा पेटंट करायला हरकत नाही.
- विवेक पंडित, संस्थापक, विद्यानिकेतन शाळा

कोट
सण, उत्सव काळात कमानींसाठी रस्ता खणला जातो. त्याची दुरुस्ती केली जात नाही. खड्ड्यांनी बकाल अवस्था आली असताना समस्यांकडे लक्ष देण्याऐवजी कार्यक्रम घेतले जातात. कामांना विलंब लावून निधी लाटण्यामागे सत्ताधारी, कंत्राटदार यांची मिलीभगत असते. हे सर्व काही जोपर्यंत थांबत नाही किंवा नागरिक आवाज उठवित नाहीत, तोपर्यंत असेच सुरू राहणार. राजकारण्यांनी थोडा विचार करण्याची गरज आहे, अन्यथा येत्या काळात जनता नक्कीच त्यांचा विचार करेल.
- उदय पेंडसे, नागरिक