
दूषित पाण्यावरून आंदोलनाची हाक
पनवेल, ता. २५ (बातमीदार) : पनवेल तालुक्यातील लाडिवलीसह परिसरातील गावांना दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. या प्रश्नावरून आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी ११ ऑक्टोबरला कोकण आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढून बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
पनवेल पंचायत समितीची जलजीवन मिशनमधून एक कोटी एकोणीस लाख रुपयांची योजना मंजूर होऊनही कार्यान्वित झाली नसल्याने नागरिकांना दूषित पाणी प्यावे लागत आहे. याच अनुषंगाने लाडिवली येथील हनुमान मंदिरात ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली नुकतीच एक बैठक घेण्यात आली. या बैठकीत जलजीवन मिशनमधून एक कोटी एकोणीस लाख रुपयांची योजना मंजूर होऊनही कार्यान्वित झाली नसल्याने नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या गटविकास अधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी कोकण भवन येथील कोकण आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढून बेमुदत धरणे आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला आहे.