
गोवंडीत तरुणावर प्राणघातक हल्ला
मानखुर्द, ता. २५ (बातमीदार) ः गोवंडीच्या शिवाजी नगरमध्ये दोघा मद्यपींनी नावेद शेख या तरुणावर तलवारीने गुरुवारी (ता. २२) प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात जखमी झालेल्या नावेदने शनिवारी (ता. २४) त्या दोघांविरोधात शिवाजी नगर पोलिस ठाण्यात तक्रार केली होती. त्यानुसार गुन्हा नोंदवून शिवाजी नगर पोलिसांनी एकाला अटक केली असून दुसऱ्याचा शोध सुरू आहे.
शिवाजी नगरच्या रफिक नगर भागात असलेल्या साईबाबा मंदिराजवळ नावेद गुरुवारी रात्री साडे दहाच्या सुमारास आला होता. त्यावेळी दोघांनी मद्यधुंद अवस्थेत त्याला शिवीगाळ केली. तेव्हा नावेद मद्यपीच्या आत्याकडे तक्रार करण्यासाठी निघाला होता. त्यावेळी त्यापैकी एकाने नावेदला तलवार दाखवत जास्त शहाणपणा करतो याला कापून टाकू या, या शब्दांत धमकावले. त्यानंतर तलवारीने डोके व छातीसह शरीराच्या इतर भागांवर वार केले. त्यामुळे नावेद गंभीररीत्या जखमी झाला. त्याने दिलेल्या तक्रारीनंतर विविध कलमांतर्गत प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा नोंदवून पोलिसांनी एकाला अटक केली.