डहाणूत भूजल विकास, व्यवस्थापनावर प्रशिक्षण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डहाणूत भूजल विकास, व्यवस्थापनावर प्रशिक्षण
डहाणूत भूजल विकास, व्यवस्थापनावर प्रशिक्षण

डहाणूत भूजल विकास, व्यवस्थापनावर प्रशिक्षण

sakal_logo
By

कासा, ता. २५ (बातमीदार) : सध्या वातावरणाच्या बदलामुळे कधी जोरदार पाऊस, तर कधी कडक ऊन पडत आहे. त्यामुळे भूजल विकास व पाणी नियोजन व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. या करीता डहाणू पंचायत समितीच्या पद्मश्री कै. जिव्या म्हसे सभागृहात गुरुवारी भारत सरकारच्या जलशक्ती मंत्रालयातर्फे प्रशिक्षणाचे आयोजन केले होते.
जिल्ह्यातील भूजलाचा विकास व पाणी व्यवस्थापनाचे महत्त्व लोकसहभागातून करणे शक्य आहे. त्याबाबत व्यापक जनजागृतीची आवश्यकता या शिबिरातून मांडण्यात आली. यावेळी पुस्तिका, पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन या माध्यमातून व्याख्यानात उपस्थितांना माहिती देण्यात आली. विंधन विहिरीपेक्षा विहिरी खोदण्याला प्राधान्य देऊन त्या नेमक्या कुठे खोदाव्यात व त्यासाठी कोणती जमीन निवडावी यावर यावेळी माहिती देण्यात आली. पालघर जिल्ह्यातील डोंगर, समुद्र या विविध क्षेत्रांनुसार तेथील प्रत्येक क्षेत्रांत भूजलाची पातळी वेगळी आहे. येथील भूजलाचा विकास व पाणी व्यवस्थापनाची माहिती केंद्रीय भूजल बोर्ड मध्यक्षेत्र नागपूर येथील तज्ज्ञांनी दिली. त्यामध्ये कार्तिक डोंगरे यांनी पालघर जिल्ह्याचा जलभृत मानचित्रण व भूजल प्रबंध, तर भूजल संसाधन २०२०, स्थानिक स्तरावरील भूजल आणि भूविज्ञान याबद्दल शिवलिंग चव्हाण यांनी माहिती दिली. भूजल गुणवत्तेबद्दल दिलीप जाधव यांनी माहिती दिली.
या प्रशिक्षणाच्या दुसऱ्या सत्रात जनसहभाग आणि ग्रामीण स्तरावर पाण्याची ताळेबंदी याबाबत संदीप वाघमारे यांनी मार्गदर्शन केले. भूजल अन्वेषनाबाबत एस. वेंकटेश यांनी सांगितले. पालघर जिल्ह्यातील पावसाच्या पाण्याचे कृत्रिम पुनर्भरण याबद्दल श्रीनिवास पवार यांनी मार्गदर्शन केले. या एकदिवसीय प्रशिक्षणात शासकीय अधिकारी, ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी, तालुका कृषी विभाग, ग्रामस्थ उपस्थित होते. या प्रशिक्षण शिबिराचे आभार संदीप वाघमारे यांनी मानले.