
वयोवृद्ध नागरिकांना लुटणाऱ्यांना अटक
मुंबई, ता. २५ : वयोवृद्ध नागरिकांना धमकावून लुटणाऱ्या तीन आरोपींना मुलुंड पोलिसांनी अटक केली आहे. रमेश विजयकुमार जैस्वाल, नरेश विजयकुमार जैस्वाल, संजय दत्ताराम मांगडे अशी अटक आरोपींची नावे आहेत. ८ सप्टेंबर रोजी एक ६० वर्षीय पीडित वृद्ध मुलुंड परिसरातील नेहरू रोड येथून दुपारी रस्त्याने चालत घरी जात असताना तीन अनोळखी इसमांनी लुटले होते. या घटनेनंतर पीडित व्यक्तीने मुलुंड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला. मुलुंड पोलिसांनी विशेष पथक तयार करून गुन्ह्याचा जलद गतीने तपास सुरू केला. त्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले असता, हा गुन्हा आरोपी रमेश विजयकुमार जैस्वाल, नरेश विजयकुमार जैस्वाल, संजय दत्ताराम मांगडे यांनी केल्याचे निष्पन्न झाले. तपासात आरोपींनी एकूण १८ ठिकाणी फसवणुकीचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले असून त्यांनी आणखीन गुन्हे केल्याची शक्यता आहे. आरोपींकडून एकूण ३३० ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांसह १४ लाख किमतीची मालमत्ता हस्तगत करण्यात आली आहे.