BMC Election : मुंबई महापालिका २२७ वॉर्डांची की २३८? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

BMC Election
महापालिका २२७ वॉर्डांची की २३८?

BMC Election : मुंबई महापालिका २२७ वॉर्डांची की २३८?

मुंबई : महाराष्ट्राचा राजकीय मूड दाखवणाऱ्या मिनी विधानसभा निवडणुका केव्हा होणार याकडे सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचे लक्ष लागले असतानाच यासंबंधीचा निर्णय पुढच्या दोन दिवसांत २८ सप्टेंबरला लागण्याची चिन्हे आहेत. मुंबई महापालिकेची निवडणूक किती वॉर्डात घेतली जाईल तसेच सर्व जिल्हा परिषदांमध्ये ओबीसी आरक्षण लागू होईल काय, याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयात २८ तारखेला घेणार असल्याचे समजते. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांच्यातील वर्चस्ववादात सर्वांत महत्त्वाची असणारी मुंबई महापालिका निवडणूक नक्की केव्हा होणार याचा फैसलाही या याचिकेतच होण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारने मुंबईतील वॉर्डांची संख्या २३८ केली होती. या रचनेला रद्दबातल ठरवत एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकारने पुन्हा पूर्वीच्या २२७ वॉर्डांवर संख्याबळ नेले आहे.

यातील कोणत्या वॉर्डरचनेनुसार मुंबई पालिकेची निवडणूक होणार हे न्यायालय ठरवणार आहे. २३८ वॉर्डांनुसार मतदार याद्या तयार झाल्या असून केवळ आरक्षण ठरवणे बाकी आहे. सर्वोच्च न्यायालयाने २३८ वॉर्डसंख्येस मान्यता दिली तर मुंबई महापालिकेच्या निवडणुका नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये होऊ शकतात; मात्र वॉर्डसंख्या निश्चित करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय मान्य करीत संख्या २२७ केल्यास मतदारयाद्यांची फेररचना करावी लागेल. त्यासाठी लागणारा वेळ लक्षात घेत निवडणुका २०२३ मध्ये जाऊ शकतात असे एका संबंधित अधिकाऱ्याने सांगितले.

राजकीय आखाड्याची वाटचाल
मुंबईच्या अतिमहत्त्वाच्या आणि अतिसंवेदनशील विषयाबरोबरच ओबीसींना राजकीय आरक्षण बहाल करणारा बांथिया अहवाल स्वीकारला जाण्यापूर्वी ज्या ९४ नगरपालिका आणि २५ जिल्हा परिषदांच्या निवडणुका घोषित झाल्या होत्या, तेथे आरक्षण लागू करण्याची याचिकाही न्यायालयाच्या विचाराधीन आहे. या निर्णयावरच महाराष्ट्रातील राजकीय आखाड्याची वाटचाल अवलंबून असेल. निवडणूक आयोग सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार निवडणूक कार्यक्रम जाहीर करेल.