
सेवा पंधरवड्यात प्रलंबित प्रकरणांचा तातडीने निपटारा करा
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २७ : राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवड्यात महापालिकेतील प्रलंबित प्रकरणांचा तातडीने निपटारा करण्यात यावा, अशा सूचना महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी सर्व विभागांना दिल्या आहेत.
शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान राबविला जात आहे. सामान्य जनतेची कामे विहित मुदतीत पूर्ण व्हावी यासाठी राज्यशासनाने आपले सरकार सेवा पोर्टल व नागरी सेवा केंद्र, विभागांचे स्वत:चे पोर्टल व वेब पोर्टल सुरू केले आहे. त्या माध्यमातून जनतेची कामे ठरवून दिलेल्या मुदतीत पूर्ण होणे अपेक्षित आहे. या सेवा पंधरवड्यात विवाह नोंदणी प्रमाणपत्र देणे, मालमत्ता हस्तांतरण नोंद प्रमाणपत्र देणे, नव्याने नळ जोडणी देणे, मालमत्ता कराची आकारणी करणे व मागणीपत्र देणे आदी कामांसाठी प्राप्त झालेल्या अर्जांचा या कालावधीत निपटारा करावा, अशा सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत.
--