कुलस्वामिनी शितलादेवीचा केळव्यात जागर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुलस्वामिनी शितलादेवीचा केळव्यात जागर
कुलस्वामिनी शितलादेवीचा केळव्यात जागर

कुलस्वामिनी शितलादेवीचा केळव्यात जागर

sakal_logo
By

पालघर, ता. २७ (बातमीदार) : तालुक्यातील किनारपट्टीवर असलेल्या केळवे गावात अतिप्राचीन शीतलादेवीचे मंदिर आहे. रामकुंडासमोरच आकर्षक असे मंदिर बांधून श्री शीतलामातेची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. नवरात्रोत्सवात विविध धार्मिक उपक्रमांची रेलचेल या ठिकाणी असल्याने गुजरात व महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील भाविक शुद्ध, सात्विक, एकाग्र भावनेने आदिमाता श्री शीतलादेवीचे पूजन, स्मरण करत चरणी लीन होत देवीचा जागर केला जातो.
नवरात्र उत्सवात घटस्थापना व देवीची आराधना केली जाते. हजारो वर्षांपूर्वी रामकुंडाच्या समोर असलेल्या जमिनीखाली सुप्तावस्थेत शीतलादेवीने दृष्टांत देत पुन्हा तिची स्थापना करण्यात यावी असे संकेत दिल्यावर वालिकेश्वराच्या बाजूला प्रतिष्ठापना करण्यात आली. प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने हा परिसर पुनित झाला आहे. रामायण काळात केळवे गाव कर्दलीही म्हणून ज्ञात होते. धार्मिक तीर्थक्षेत्र असून हा परिसर दंडकारण्य म्हणून ओळखला जात होता. अनेक तत्कालीन धर्मग्रंथांत येथील ऐतिहासिक उल्लेख सापडतो. या ठिकाणी स्वयंभू शिवलिंग रामकुंड आहे.
महाराष्ट्र व गुजरात राज्यांतील भाविकांची कुलस्वामिनी म्हणून या देवीची ओळख आहे. वर्षाकाठी लाखो भाविक दर्शनासाठी येतात. स्त्रिया खणा-नारळाने ओटी भरतात. नवरात्रउत्सवात देवीच्या दर्शनासाठी महिलांची मोठी गर्दी होत असते. त्यामुळे केळवे शीतलादेवी देवस्थान ट्रस्टकडून चोख व्यवस्था करण्यात येते. नवरात्रोत्सवात एकूण नऊ माळ देवीला चढवल्या जातात, असे मंदिर व्यवस्थापन समितीकडून सांगण्यात आले.
.....
पणत्यांचा उत्सव
त्रिपुरारी पौर्णिमेला दीपोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे. हजारो पणत्यांनी मंदिर परिसर उजळून निघतो व भाविक देवीच्या नामस्मरणात तल्लीन होत असतात. नवत्रोत्सवात या ठिकाणी परिसर भक्तांनी फुलून जातो. या आदिमायेची महिमा भाविकांना नेहमीच आकर्षित करत आली आहे. त्यामुळे नागरिकांना तिच्या दर्शनाची ओढ कायम असते.
---
इतर राज्यांमध्येही महती
नवत्रोत्सवात महिला नऊ देवींचे दर्शन घेतात. या वेळी केळव्याच्या शीतलादेवी मंदिराला आवर्जून भेट दिली जाते. गुजरात, आंध्र प्रदेश राज्यांतून शेकडो भक्तगण नवरात्रउत्सवात देवीच्या दर्शनासाठी पालघरमध्ये दाखल होत असतात.