
बेकायदा फलकबाजीने महसुलावर पाणी
खारघर, ता. २७ (बातमीदार) : पनेवल महापालिका क्षेत्रात सध्या बेकायदा जाहिरात फलकांचे पेव फुटले आहे. खारघर प्रभाग कार्यालय हद्दीतील तळोजा आणि घोट रस्त्यावर नियमबाह्य पद्धतीने मोठ्या प्रमाणात जाहिरात फलक उभारण्यात आले असून पालिका अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे लाखो रुपयांच्या महसुलावर पाणी सोडण्याची वेळ आली आहे.
तळोजा फेज दोन तसेच घोटगाव परिसरात मोठ्या प्रमाणात विविध गृहप्रकल्पांची कामे सुरू आहेत. या प्रकल्पांच्या जाहिरात बाजीतून ग्राहकांना आकर्षित करण्याचे विविध फंडे व्यावसायिकांकडून केले जात आहेत. यासाठीची चढाओढ रस्त्यांलगत होणाऱ्या जाहिरातबाजीतूनही दिसत आहे. तळोजा वसाहतीत प्रवेश करताच विविध गृहप्रकल्पांच्या जाहिरातींची बेकायदा फलकबाजी करण्यात आली आहे. काही राजकीय मंडळी आणि पालिका अधिकाऱ्यांना हाताशी धरून हे प्रकार केले जात असल्याचे दिसत आहे. तळोजा फेज एक तसेच तळोजा फेज दोनमधून घोटगावकडे जाणाऱ्या रस्त्याचा कडेला लोखंडी खांब उभारून बेकायदा जाहिरातबाजी केली जात आहे. यासाठी एका फलकाचे मासिक तीस हजार रुपये भाडे आकारण्यात येत असून या बेकायदा फलकबाजीमुळे पालिकेवर हक्काच्या महसुलापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.
़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़
दुर्गोत्सवात अधिकारी व्यग्र
पालिका मुख्यालयात जाहिरात होर्डिंग परवान्याविषयी विचारणा केली असता, मालमत्ता विभागातून परवानगी दिली जाते असे सांगितले. मालमत्ता कर विभागात विचारणा केली असता, दुर्गोत्सव कार्यक्रम परवानगीच्या कामात व्यग्र असल्याचे सांगून माहिती देण्यास नकार दिला.
़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़
दुर्घटना झाल्यास जबाबदार कोण?
तळोजा फेज दोनमधून घोटकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला लोखंडी खांब उभारून जाहिरात केली जात आहे. वादळी वाऱ्याने रस्त्याने जाणाऱ्या वाहनावर अथवा व्यक्तीवर हा फलक पडल्यास मोठी दुर्घटना होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे अशा बेकायदा जाहिरात फलकांवर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे.
़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़
तळोजा आणि घोट रस्त्यावर बेकायदा जाहिरातबाजी केल्याची माहिती मिळाली आहे. लवकरच या फलकांवर पालिकेकडून कारवाई करण्यात येईल.
-जितेंद्र मढवी, प्रभाग अधिकारी, खारघर