
घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक
मानखुर्द, ता. २७ (बातमीदार) ः घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला शिवाजीनगर पोलिसांनी मंगळवारी (ता. २७) पहाटे गोवंडीच्या डम्पिंग रोड परिसरातून अटक केली. रमजानअली शेख ऊर्फ रमजान लंगडा असे त्याचे नाव असून त्याच्याकडून तीन लाखांहून अधिक किमतीचे चोरलेले व गुन्ह्यात वापरलेले साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे. त्याच्याविरोधात विविध पोलिस ठाण्यांत गुन्ह्यांची नोंद असून चार गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे.
शिवाजीनगर पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आलेल्या एका गुन्ह्याच्या तपासावेळी सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासले. त्या फुटेजमधून एका संशयिताची ओळख पोलिसांनी पटवली होती. त्याविषयी खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे डम्पिंग रोड परिसरात सोमवारी रात्री पोलिसांनी सापळा लावला होता. वरिष्ठ निरीक्षक अर्जुन राजाने, निरीक्षक इकबाल शिकलगार, जब्बार तांबोळी, सहायक निरीक्षक सचिन कदम व नवनाथ काळे यांनी या पथकाचे नेतृत्व केले. त्या वेळी तेथे आलेल्या रमजान याला ताब्यात घेतले व त्याच्याकडील बॅगची तपासणी केली. त्या बॅगेत चोरलेले दागिने तसेच घरफोडी करण्यासाठी वापरलेली साहित्य आढळली. त्याने त्याच्या गुन्ह्यांची कबुली दिली आहे.