
अंतिम दिवशी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी लगबग
कासा, ता. २७ (बातमीदार) : नवरात्रीच्या मुहूर्तावर २७ सप्टेंबर रोजी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सरपंच व उमेदवारी अर्ज भरण्यासाठी डहाणू सेंट मेरीज हायस्कूल येथे मोठ्या संख्येने गर्दी झाली होती. मंगळवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा असल्याने अनेक उमेदवारांनी गर्दी केली होती.
जिल्ह्यात १३ ऑक्टोबर रोजी ग्रामपंचायतींच्या निवडणूक आहे. थेट सरपंचपदाच्या निवडणुकीसह सदस्यपदांच्या निवडणुकीसाठी डहाणू तालुक्यात ८५ पैकी ६२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका असून एकूण ७१८ जागा आहेत. अर्ज भरण्यास २१ सप्टेंबरपासून सुरुवात झाली. त्यात पितृपक्ष असल्याने शुक्रवारपर्यंत केवळ १२२ अर्ज दाखल झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डहाणू तहसीलदार अभिजीत देशमुख यांनी दिली. सोमवार, २६ सप्टेंबरला घटस्थापनेच्या मुहूर्तावर अनेकांनी अर्ज भरले; तर मंगळवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे डहाणूतील सेंट मेरीज हायस्कूल येथे एकच गर्दी झाली होती. यामुळे निवडणूक प्रक्रियेसाठी नियुक्त केलेल्या शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची दमछाक झाली. डहाणूत यामुळे शहरातील रस्त्यावर वाहनांची गर्दी होती.