रंगभूमी सेवाव्रतींच्या रंगतदार किस्स्यांनी रंगला विवा कट्टा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रंगभूमी सेवाव्रतींच्या रंगतदार किस्स्यांनी रंगला विवा कट्टा
रंगभूमी सेवाव्रतींच्या रंगतदार किस्स्यांनी रंगला विवा कट्टा

रंगभूमी सेवाव्रतींच्या रंगतदार किस्स्यांनी रंगला विवा कट्टा

sakal_logo
By

विरार, ता. २७ (बातमीदार) ः वसईमध्ये साहित्य, कला, संस्कृती यांची चळवळ रुजवणाऱ्या आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या यंग स्टार ट्रस्टतर्फे सातत्याने वेगवेगळे उपक्रम घेतले जात आहेत. याचाच एक भाग म्हणजे ५५ व्या विवा कट्ट्यावर या वेळी रंगभूमीवरील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ अशा रंगकर्मींनी आपला रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील प्रवास उलगडला. या प्रवासात त्यांनी अनेक आठवणींना उजाळा दिला.

मराठी रंगभूमीवरील एक महत्त्वाचे नाव म्हणजे अरुण होर्णेकर. अभिनेता, लेखक, दिग्दर्शक म्हणून गेली चार दशके ते या रंगशारदेची सेवा करीत आहेत. अपघाताने या क्षेत्रात आलेल्या होर्णेकर यांनी रंगभूमीवर अनेक वेगवेगळे प्रयोग केले. त्यांनी दिग्दर्शक म्हणून स्वतःचा एक वेगळा ढाचा तयार केला आहे. स्वतःच्या गरजा अगदी मोजक्या असल्याने मिळेल त्या मानधनात ते काम करतात. अभिनेत्री प्रिया तेंडुलकर हिच्याबरोबर असलेली निर्भेळ मैत्री यासाठी प्रिया तेंडुलकर यांनी आपले पहिले पुस्तक ‘पंचतारांकित’ हे माझा सच्चा मित्र अरुण होर्णेकर यांना समर्पित केले असल्याच्या आठवणीला यावेळी उजाळा मिळाला.

राष्ट्रीय पुरस्कार विजेता मराठी चित्रपट ‘श्वास’चे दिग्दर्शक आणि निर्माते संदीप सावंत यांनी या क्षेत्राचा कोणताही अभ्यास नसताना महाविद्यालयीन काळात एकांकिका लेखन व दिग्दर्शनाचे धाडस केले आणि पुढे माधुरी घारपुरे यांच्या ‘किमयागार’ या कथेवर आधारित ‘श्वास’ चित्रपट निर्मितीचा संपूर्ण प्रवास अनेक किश्‍श्‍यांतून रसिकांसमोर मांडला. त्यानंतर ऑस्करसाठी झालेले नामांकन, यासाठी आर्थिक पाठबळ कसे मिळवले, तो सिनेमा महाराष्ट्रभर कसा चालवला गेला, याची कथा मांडली; तर ‘नदी वाहते’ या सामाजिक, पर्यावरणाचा संदेश देणाऱ्या सिनेमाबाबत गप्पा मारल्या.

यावेळी वसई तालुका कला क्रीडा मंडळाचे संघटक सचिव, माजी नगरसेवक संतोष वळवईकर याच्यासह वसईतील अनेक मान्यवर नाट्यप्रेमी रसिक प्रेक्षक उपस्थित होते. स्वागत स्वाती जोशी यांनी केले.

चौकट
म्हणूनच ‘व्रतस्थ रंगकर्मी’ची उपमा
यश मिळो अथवा अपयश, या दोघांचा हा प्रवास अखंडपणे सुरू आहे. जणू काही या रंगशारदेचे हे व्रत या रंगकर्मींनी घेतले आहे; म्हणूनच त्यांना ‘व्रतस्थ रंगकर्मी’ म्हणून संबोधले आहे. माध्यमांसमोर स्वत:बद्दल कधीच काही न सांगणाऱ्या अरुण होर्णेकर यांना मुलाखतकार मकरंद सावे यांनी आपल्या खुमासदार प्रश्नशैलीने बोलते केले. त्यांचे वसईतील मित्र नाट्यदिग्दर्शक विलास पागार यांनीही त्यांचे काही किस्से सांगितले.