जव्हार तालुक्यात पर्यटनप्रेमींची होतेय गैरसोय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जव्हार तालुक्यात पर्यटनप्रेमींची होतेय गैरसोय
जव्हार तालुक्यात पर्यटनप्रेमींची होतेय गैरसोय

जव्हार तालुक्यात पर्यटनप्रेमींची होतेय गैरसोय

sakal_logo
By

जव्हार, ता. २७ (बातमीदार) : निसर्गाने केलेली मुक्तहस्ताने रंगांची उधळण आणि हिरवीगार वनराई यामुळे जव्हार तालुका निसर्गसंपन्न म्हणून ओळखला जातो. दाट झाडी, डोंगरदऱ्या, येथील आदिवासी संस्कृती, निसर्गनिर्मित धबधबे आणि सहाशे वर्षे राजे मुकणे यांनी राज्यकारभार केलेले संस्थान अशी जव्हार तालुक्याची इतिहासात विशेष नोंद आहे. पावसाळ्यात या तालुक्यात पर्यटनप्रेमींची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. याचे कारण म्हणजे या भागात आकर्षित करणारी पर्यटन स्थळे आणि त्यांचे नैसर्गिक सौंदर्य; परंतु हे सगळे वैभव निसर्गाने दिले असतानाही या तालुक्यात आलेल्या पर्यटनप्रेमींची प्रचंड गैरसोय होताना दिसत आहे. पर्यटनस्थळांच्या विकासाबाबत शासनाचे धोरण उदासीन ठरत आहे.
तालुक्यात अनेक ऐतिहासिक, नैसर्गिक पर्यटनस्थळे आहेत; परंतु शासन, लोकप्रतिनिधींच्या आणि स्थानिक प्रशासन यांच्या दुर्लक्षामुळे ही क्षेत्रे विकासापासून कोसो दूर आहेत. या क्षेत्रांना भेटी देणाऱ्या पर्यटकांची मूलभूत सोयी-सुविधांअभावी गैरसोय होत आहे. यामुळे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन पर्यटनस्थळांचा विकास करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे. जगभरात २७ सप्टेंबर हा दिवस जागतिक पर्यटन दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त जव्हार तालुक्यातील काही पर्यटन स्थळांचा आढावा घेतला असता असुविधांचा प्रश्न कायम दिसला. जव्हार शहरासह दाभोसा धबधबा, हिरडपाडा धबधबा व काळ मांडवी येथील धबधबा, जव्हार शहरातील राजे शिवछत्रपती यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले शिरपा माळ, जुना राजवाडा, काट्या मारुती म्हणजेच सध्याचे हनुमान पॉईंट, सनसेट पॉईंट ही स्थळे धार्मिक, ऐतिहासिक पर्यटनाची केंद्रे आहेत. मात्र स्थानिकस्तरावर सार्वजनिक व मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याने पर्यटनात वाढ होत नाही.

चौकट
प्रभावी धोरण राबवणे गरजेचे
धबधब्यांचा तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जव्हार तालुक्यात निसर्गनिर्मित विलोभनीय व रमणीय अशी पर्यटनस्थळे आहेत; परंतु या भागात जाण्यासाठी रस्त्यांना पडलेले मोठ्या प्रमाणातील खड्डे, दळणवळणासाठी असलेली तोकडी वाहतूक व्यवस्था, राहण्याची, खाण्याची व प्राथमिक उपचार या बाबींची वानवा संपवण्याबाबत राज्य शासनाने प्रभावीपणे योजनांची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. पर्यटनामुळे या भागात रोजगार वाढून येथील आदिवासी नागरिकांचे स्थलांतर थांबेल.

कोट
जव्हार तालुक्याला निसर्गाने मोठ्या प्रमाणात सौंदर्य बहाल केले आहे. येथील सृष्टीसौंदर्य फुलवायचे झाल्यास पर्यटनवृद्धीला चालना देणे गरजेचे आहे. राज्य शासनानेदेखील येथील पर्यटनासाठी विकासात्मक ध्येयधोरणे ठरवणे गरजेचे आहे.
- पारस सहाणे, अभ्यासक, जव्हार पर्यटन