
अंबरनाथ नगरपालिका शाळांचा शैक्षणिक दर्जा सुधारा
अंबरनाथ, ता. २७ (बातमीदार ) ः अंबरनाथ नगरपालिका शाळांचा शैक्षणिक दर्जा सुधारावा. पालिकेच्या सर्व शाळांमध्ये सेमी इंग्रजीचे वर्ग सुरू करावेत. तसेच शाळांतील विद्यार्थी पटसंख्या वाढीसाठी प्रयत्न करण्याचे निर्देश आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी नगरपालिका प्रशासनाला दिले आहेत. आमदार डॉ. किणीकर यांनी मंगळवारी (ता. २७) शहरातील पालिकेच्या सर्व शाळांचे मुख्याध्यापक, कक्ष समन्वयक तसेच पालिका मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांच्यासमवेत आढावा बैठकीत शाळांचा शैक्षणिक दर्जा सुधारणाविषयी चर्चा झाली.
नगरपरिषदेच्या बऱ्याच शाळांच्या इमारती सध्या जीर्ण झाल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सोयीच्यादृष्टीने या सर्व शाळांची योग्य ती दुरुस्ती करणे, त्याचबरोबर सर्व शाळांवर सुरक्षारक्षक नेमण्यात यावेत. अंबरनाथ पूर्व भागातील एमपीएससी भवनमध्ये सुरू करण्यात आलेल्या शाळेमध्ये तसेच अंबरनाथ पश्चिम भागातील पटसंख्या जास्त असलेल्या शाळेत प्रायोगिक तत्वावर सेमी इंग्रजी शाळा सुरू करण्यात यावी. त्याकरिता आवश्यक शिक्षक मानधन तत्वावर नियुक्ती करण्याबाबतचा प्रस्ताव शिक्षण संचालक यांच्याकडे सादर करावा, अशा सूचना आमदार डॉ. किणीकर यांनी मुख्याधिकारी डॉ. रसाळ यांना दिल्या.
अंबरनाथ नगरपालिकांच्या शाळांच्या दुरावस्थेबाबत ‘सकाळ’ने वृत्त प्रसिद्ध करून लक्ष वेधले होते. वडोळ गावातील शाळा क्रमांक १३ मधील शाळेच्या छतावरील उडालेल्या शेडमुळे भर पावसात वर्गात येणाऱ्या पावसाच्या पाण्यामुळे शिक्षक आणि विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागला होता. कानसई शाळा क्रमांक आठमधील दुरावस्थेबाबत देखील प्रकाशझोत टाकला होता. यानंतर खडबडून जाग आलेल्या पालिका प्रशासनाने शाळेत दुरुस्तीचे काम हाती घेतले होते. याशिवाय शाळांच्या दुरुस्तीकडे लक्ष देऊन शिक्षक आणि विद्यार्थ्यांना चांगले वातावरण मिळावे यासाठी तोडगा काढण्याचे देखील आश्वासन आमदार डॉ. किणीकर यांनी दिले होते.
या बैठकीला माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी, माजी उपनगराध्यक्ष अब्दुलभाई शेख, माजी नगराध्यक्षा प्रज्ञा बनसोडे, माजी नगरसेवक सुनील सोनी, सुभाष साळुंके, रवींद्र पाटील, नगरपरिषदेचे अतिरिक्त मुख्याधिकारी डॉ. प्रशांत शेळके, प्रशासन अधिकारी गजानन मंदाडे तसेच सर्व शाळांचे मुख्याध्यापक व कक्ष समन्वयक उपस्थित होते.
कोट
शाळा दुरुस्तीबाबतचा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे पाठवण्यात येणार आहे. शाळांमध्ये यावर्षी पटसंख्या ५० ने वाढली आहे. १६०० विद्यार्थी पालिकेच्या १७ शाळांत शिक्षण घेतात. पालिका शाळांची गुणवत्ता वाढवण्याचा प्रयत्न केला जाईल. दोन शाळांमध्ये सेमी इंग्रजीच्या शिक्षणाचा प्रस्ताव शासनाला पाठवला जाणार आहे.
डॉ. प्रशांत रसाळ, मुख्याधिकारी, महापालिका