खड्ड्यांमुळे एसटी बसच्या बिघाडात वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खड्ड्यांमुळे एसटी बसच्या बिघाडात वाढ
खड्ड्यांमुळे एसटी बसच्या बिघाडात वाढ

खड्ड्यांमुळे एसटी बसच्या बिघाडात वाढ

sakal_logo
By

अलिबाग, ता. २७ (बातमीदार) ः राष्ट्रीय महामार्गासह जिल्हा, तालुका रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. खड्‌ड्यांमुळे एसटी नादुरुस्‍त होण्याचे प्रकार वाढले आहेत. टायर पंक्चर होणे, स्प्रिंग पाटे तुटण्याचे अनेक प्रकारच्या नुकसानीला सामोरे जावे लागत असल्याचे एसटी महामंडळाच्या रायगड विभागाकडून सांगण्यात आले आहे.
रायगड जिल्ह्यात अलिबाग, पेण, कर्जत, माणगाव, महाड, श्रीवर्धन, रोहा, मुरूड असे आठ एसटी आगार आहेत. आगारातून लांब पल्ल्यापासून तालुका, गाव पातळीवर ४०० हून अधिक बस धावतात. एसटीतून प्रवास करणारे विद्यार्थी, कर्मचारी व अन्य प्रवासी सुखरूप व आरामदायी स्वरूपात निश्चितस्थळी पोहचावे, यासाठी एसटी महामंडळाकडून वेगवेगळ्या स्कीम राबवल्या जातात. काही बस या निम आरामदायी, वातानुकूलित सुरू करण्यात आली आहे. विना थांबासारख्या सेवाही सुरू केल्या आहेत.
दिवसाला एक लाखापेक्षा अधिक जण प्रवास करतात. परंतु जिल्ह्यातील पनवेल-पेण, पेण-वडखळ, वडखळ-माणगाव, अलिबाग-रोहा, अलिबाग-रेवदंडा-मुरूड, रामराज- बोरघर अशा अनेक मार्गावर ठिकठिकाणी मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. खड्ड्यातून बस चालवताना चालकांना अक्षरशः कसरत करावी लागते. खड्ड्यांमुळे दिवसाला प्रत्येक आगारात सुमारे ५ पेक्षा अधिक बस पंक्चर होत आहेत. स्प्रिंग पाटे तुटणे,
सीट निखळले असे प्रकार होत असल्‍याने एसटीला आर्थिक नुकसानीला तोंड द्यावे लागत आहे. बसमधील बिघाडाचे प्रमाण दररोज वाढतच आहे. नियोजित वेळेत स्थानकात एसटी बस पोहचत नसल्‍याने प्रवाशांना रोजच लेटमार्क लागतो. खड्ड्यांमुळे बसचा वेगही मंदावला आहे. त्‍यामुळे एसटीचे वेळापत्रक कोलमडते.

खड्ड्यांमुळे एसटी बस निश्चित स्थळी पोचण्यास विलंब होतो. बसमध्ये वारंवार बिघाड होत असून गाडीचे पार्ट नादुरुस्‍त होत आहेत. त्यामुळे देखभाल-दुरुस्तीचा खर्च वाढला आहे. बसचे वेळापत्रक विस्कटल्‍याने प्रवाशांना वेळेचा अपव्यय होत आहे.
- अजय वनारसे, आगार व्यवस्थापक, अलिबाग