
सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात महिला उद्योजकासाठी संवाद
पालघर, ता. २७ (बातमीदार) ः महिलांसाठी उद्योजकता विकासाचा संकल्प घेत पालघर येथे ‘संवाद २०२२’ या परिसंवादाचे सोमवारी (ता. २६) आयोजन करण्यात आले होते. स्वयंशक्ती स्त्री उद्यम फाऊंडेशन, सोनोपंत दांडेकर महाविद्यालय आणि विमा द असोसिएशन ऑफ वुमन इंटरप्रीनर इंडस्ट्री ऑफ महाराष्ट्र मुंबई सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम पार पडला.
या परिसंवादामध्ये ११५ महिला उद्योजकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता. याप्रसंगी महिला उद्योजकांसाठी असणाऱ्या विविध शासनाच्या योजना, बँकेचा सहभाग इत्यादी विविध विषयांवर मार्गदर्शन करून महिला उद्योगांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. जिल्हा उद्योग केंद्र पालघरचे व्यवस्थापक श्रीयुत खिराले यांनी जिल्हानिहाय विविध सरकारी योजनांची माहिती दिली. बँक ऑफ महाराष्ट्र ठाणे विभागाचे मुख्य व्यवस्थापक जयानंद भारती व बँक ऑफ महाराष्ट्र जिल्हा ग्रामीण बँकेचे मुख्य व्यवस्थापक विक्रांत पाटील यांनी बँकेचे व्यवहार कसे असावेत, कर्जासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करत असताना घ्यावयाची काळजी याबद्दल मार्गदर्शन केले.
या वेळेला दांडेकर शिक्षण मंडळाचे सचिव प्राध्यापक अशोक ठाकूर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर किरण सावे यांनीही मार्गदर्शन केले. वाणिज्य विभागाचे प्रमुख डॉ. मनीष देशमुख यांनी सहभागी महिला उद्योजकांचे व सर्व पाहुण्यांचे स्वागत केले. विमा तसेच टेक्नोमाईन फाऊंडेशनच्या अध्यक्ष दीपा राऊत यांनी महिलांच्या उद्योगवाढीसाठी कार्यरत विमाच्या विविध उपक्रमाची माहिती दिली. स्वयंशक्ती संस्थेच्या अध्यक्षा दीपाली चांडक यांनी स्वयंशक्तीअंतर्गत आयोजित करण्यात येत असलेल्या महिला उद्योजकाला विकासासाठीच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समन्वयक राधिका पवार यांनी केले.
फोटो महिला उद्योजकांना मार्गदर्शन करताना