
अंबरनाथमध्ये होणार रस्ते सफाई हायटेक !
अंबरनाथ, ता. २७ (बातमीदार) ः अंबरनाथ शहरातील रस्ते यांत्रिक पद्धतीने स्वच्छ करण्यात येणार आहेत. त्यासाठी अत्याधुनिक पद्धतीची बॅटरीवर चालणारी चार इलेक्ट्रॉनिक यंत्रे नगरपालिकेने खरेदी केली आहेत. सध्या सफाई खात्याच्या कर्मचाऱ्यांना यंत्र चालवण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे.
स्वच्छ भारत अभियान आणि १५ व्या वित्त आयोगाच्या माझी वसुंधरा योजनेंतर्गत हवेचा दर्जा उत्तम टिकून राहावा यासाठी करावयाच्या उपाययोजनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार नगरपालिकेने यांत्रिक पद्धतीने रस्तेसफाई करण्याचा निर्धार केला आहे. शासनाकडून मिळालेल्या अनुदानातून चार इलेक्ट्रॉनिक रोड स्वीपिंग मशीन शासनाच्या अधिकृत वेबसाईटवरून खरेदी केल्या आहेत.
खरेदी केलेल्या यंत्राचे नाव गोबलर असून ते पूर्णपणे बॅटरी चार्जिंगवर चालणार आहेत. त्यामुळे वायुप्रदूषणाची समस्या होणार नाही. यंत्र चार्जिंगनंतर एका दिवसात १० तास काम करते. हवेच्या दाबामुळे रस्त्यावरील कचरा एका प्लास्टिक पाईपद्वारे खेचून घेतला जातो. त्यानंतर वाहनावर बसवण्यात आलेल्या प्लास्टिकच्या डब्यात कचरा जमा केला जातो. यामुळे सिमेंटच्या रस्त्यावरील कचरा उचलणे सोयीस्कर होणार आहे.
लवकरच ही यंत्रे शहरातील सिमेंटच्या रस्त्याची स्वच्छता करण्यासाठी वापरण्यात येणार आहेत. नगरपालिकेचे आरोग्याधिकारी सुरेश पाटील, निरीक्षक सुहास सावंत यांच्या उपस्थितीत संबंधित ठेकेदारांनी यंत्र चालवण्याचे प्रशिक्षण सफाई खात्यातील कर्मचाऱ्यांना दिले.
शासनाच्या निर्देशानुसार प्रायोगिक तत्त्वावर चार अत्याधुनिक यंत्रे आणण्यात आली आहेत. कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिल्यानंतर यंत्राद्वारे रस्ते सफाई केली जाईल.
- डॉ. प्रशांत रसाळ, मुख्याधिकारी, अंबरनाथ नगरपालिका.