
पालघर जिल्ह्यात ७७ अमृत सरोवर
मनोर, ता. २७ (बातमीदार) : पाण्याचा साठा कायमस्वरूपी राहावा, पाण्याचे स्रोत आणि पाण्याच्या व्यवस्थापनाच्या उद्देशाने पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अमृत सरोवरांची निर्मिती केली जात आहे. पालघर जिल्ह्यात ७७ अमृत सरोवरांची निर्मिती केली जाणार असून त्यापैकी १२ अमृत सरोवरांची कामे प्रगतिपथावर आहेत.
पालघर जिल्ह्यातील जव्हार आणि मोखाडा तालुके वगळता उर्वरित तालुक्यांत मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे. पाण्याचा साठा वाढविण्यासाठी केंद्र सरकारच्या आर्थिक सहकार्याने अमृत सरोवरांची निर्मिती केली जात आहे. अमृत सरोवरांच्या निर्मितीसाठी निश्चित केलेल्या ७७ अमृत सरोवरांपैकी पालघर तालुक्यात सर्वाधिक १३ अमृत सरोवरे तयार केली जाणार आहेत. ग्रामस्थांनी अमृत सरोवरांची कामे सुरू असलेल्या बारा ठिकाणी झेंडावंदन करून स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केला होता.
पालघर जिल्ह्यात मुबलक पाणीसाठा असल्याने पाण्यासारखे नैसर्गिक संसाधन मुबलक प्रमाणात निसर्गाकडून जिल्ह्याला लाभले आहे. यंदा पालघर जिल्ह्यातील प्रमुख नद्यांवरील धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत; परंतु जव्हार मोखाडा तालुक्यातील दुर्गम भागात मार्च महिन्यापासून पाणीटंचाईला सुरुवात होते. उन्हाळ्यातील तीन महिने पाण्याविना हाल होत असतात. हे चित्र बदलून या भागातील पाण्याचे दुर्भिक्ष्य संपावे, यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबवण्यात येत आहे. पाणीटंचाईवर मात आणि जलव्यवस्थापन करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने प्रत्येक जिल्ह्यात किमान ७५ अमृत सरोवरांची निर्मिती करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे; परंतु पालघर जिल्ह्यात ७७ सरोवरांची निर्मिती करण्याचा निश्चय जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आला आहे.
....
भूजल पातळी वाढणार
अमृत सरोवराच्या निर्मितीमुळे जमिनीच्या पृष्ठभागावर पाणीसाठा केला जाणार असल्याने भूजल पातळी वाढणार आहे. यामुळे पाण्याची उपलब्धता वाढू शकते. अमृत सरोवरांच्या निर्मितीमुळे भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने साजरा केलेल्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाअंतर्गत अमृत सरोवरांची निर्मितीचे विधायक स्वरूपाचे काम हाती घेण्यात आले आहे. अमृत सरोवराची निर्मिती किमान एक एकर (०.४ हेक्टर) आकारमानाचे तसेच किमान दहा हजार क्यूबिक मीटर पाणी साठवण क्षमतेचे असणार आहे. पालघर जिल्ह्यातील बारा सरोवरांची निर्मिती सद्यस्थितीत करण्यात आली आहे.
अमृत सरोवर मोहिमेअंतर्गत देशातील ग्रामीण पार्श्वभूमी असलेल्या जिल्ह्यांमध्ये ७५ अमृत सरोवरांची निर्मिती करून देशभरात ५० हजार अमृत सरोवरांची भारतात निर्मितीचे उद्दिष्ट आहे.
अस्तित्वात असलेले जलाशय आणि तलावांचे पुनरुज्जीवन तसेच गाळ काढण्याची कामे करून पाणी साठवण क्षमतेत वाढ करण्यात येत आहे. यासाठी जव्हार तालुक्याचा समावेश करण्यात आला आहे. स्थळांची यादी अंतिम करताना जिल्ह्यांनी पाण्याच्या क्षमतेत मागे असलेल्या विशेष करून पिण्याच्या पाण्याच्या बाबतीतील टंचाईग्रस्त तालुक्यांची निवड करण्यात आली असून अमृत सरोवरांचे प्रस्तावही पाठविण्यात आले आहेत. प्रस्तावात अमृत सरोवराच्या लगतच्या वाहत्या पाण्यावर प्रक्रिया करण्याच्या आणि परिसरातील अतिक्रमण हटविण्याचे निर्देश देण्यात आले आहे.
अमृत सरोवरांची संख्या
डहाणू : १०
जव्हार : ११
मोखाडा : ८
पालघर : १३
तलासरी : ८
वाडा : ९
वसई : ८
विक्रमगड : १०