
साडेआठ लाखांचे दागिने चोरणाऱ्या नोकराला अटक
कांदिवली, ता. २७ (बातमीदार) ः कांदिवली पूर्व परिसरात एका उच्चभ्रू वसाहतीतील घरी चोरी करणाऱ्या नोकराला पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे अटक केली आहे. रहिवासी शिखा सिंघवी यांच्या घरी चोरट्याने चोरी करत तब्बल साडेआठ लाखांचे दागिने लंपास केले होते. विजयकुमार बहारदार (२७) असे त्याचे नाव असून पोलिसांनी त्याला बिहारमधून ताब्यात घेतले.
शिखा सिंघवी यांनी बेडरूममधील कपाटात सोन्याचे दागिने आणि हिऱ्यांचे हार एका लॉकरमध्ये ठेवले होते. मुलाला सोनसाखळी देण्यासाठी त्यांनी कपाट उघडले असता त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी तातडीने समता नगर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून मोबाईलद्वारे माहिती घेत बिहारमधील पथराह गावात जाऊन आरोपीच्या मुसक्या आवळल्या. त्याने दागिने सोनाराला विकून त्या पैशांतून दुचाकी घेतल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी दुचाकी आणि सव्वाआठ लाखांचा ऐवज जप्त केला आहे.