
पाच हजार भटक्या श्वानांचे लसीकरण होणार
मुंबई, ता. २७ : महापालिकेच्या पशुवैद्यकीय आरोग्य खात्याद्वारे पालिका परिसरातील भटक्या श्वानांची रेबीज प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम राबवण्यात येणार आहे. रेबीज दिनानिमित्ताने राबवण्यात येणाऱ्या मोहिमेअंतर्गत साधारण पाच हजार श्वानांचे लसीकरण करण्यात येणार आहे. पालिका क्षेत्रात कार्यरत असलेल्या प्राणिप्रेमी संस्थांचे सहकार्य त्यासाठी घेण्यात येणार आहे, अशी माहिती देवनार पशुवधगृहाचे महाव्यवस्थापक व पशुवैद्यकीय आरोग्य खात्याचे प्रमुख डॉ. कलिमपाशा पठाण यांनी दिली.
बुधवारी (ता. २८) साजऱ्या होणाऱ्या जागतिक रेबीज दिनाच्या निमित्ताने डॉ. पठाण यांनी मोहिमेची माहिती दिली. ते म्हणाले, की रेबीज संसर्गजन्य रोग श्वान आणि मांजरींसारख्या संक्रमित प्राण्याने चावल्यानंतर किंवा ओरखडल्यानंतर होतो. रेबीज संसर्ग झालेल्या प्राण्याची लाळ, पीडिताच्या त्वचेच्या किंवा जखमांच्या थेट संपर्कात येते तेव्हा तो प्रसारित होऊ शकतो. रेबीज १०० टक्के घातक आजार असला, तरी त्यास प्रतिबंध करता येतो.
पशुवैद्यकीय आरोग्य खात्याच्या पुढाकाराने भटक्या श्वानांची लसीकरण मोहीम ९ ऑक्टोबर २०२२ पर्यंत राबवण्यात येणार आहे. मोहिमेत २० पशुवैद्यक सहभागी होणार आहेत. भटक्या श्वानांचे लसीकरण केल्यावर त्यांना विशिष्ट रंगाने चिन्हांकित केले जाणार आहे.
रेबीजने दर ३० मिनिटांनी मृत्यू
भारतात दरवर्षी साधारणपणे सुमारे दीड कोटी लोकांना जनावरे चावतात; तर या रोगाने मृत्यू पावणाऱ्यांची संख्या सुमारे २५ ते ३० हजारांच्या दरम्यान आहे. याबाबत ९० टक्क्यांपेक्षा जास्त प्रकरणी श्वानांचा संबंध असतो, त्यातही भटक्या श्वानांची संख्या अधिक असते. या रोगाचा प्रादुर्भाव १.७ टक्के असल्याचा अंदाज आहे. देशात दर ३० मिनिटांनी रेबीज संसर्गित मृत्यूची नोंद होते.