माथेरानमध्ये ई-रिक्षाला प्रायोगिक तत्त्वावर मंजुरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माथेरानमध्ये ई-रिक्षाला प्रायोगिक तत्त्वावर मंजुरी
माथेरानमध्ये ई-रिक्षाला प्रायोगिक तत्त्वावर मंजुरी

माथेरानमध्ये ई-रिक्षाला प्रायोगिक तत्त्वावर मंजुरी

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ : माथेरान गिरिस्थान नगर परिषद परिसरामध्ये पर्यावरणपूरक ई-रिक्षा सुरू करण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या १२ मे रोजीच्या निर्णयानुसार, माथेरानमध्ये तीन महिन्यांच्या कालावधीकरिता ई-रिक्षांना प्रायोगिक तत्त्वावर परवानगी देण्यात आली. यादरम्यान माथेरान परिसरामध्ये ई-रिक्षांची व्यवहार्यता पडताळणी केली जाणार असल्याचे परिवहन विभागाने सांगितले.

सदर पडताळणीकरिता ई-रिक्षांच्या मॉडेलची निवड करण्याच्या अनुषंगाने रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी चाचणी समिती स्थापन करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार विविध विभागामधील अधिकाऱ्यांची नियुक्ती करून ई-रिक्षा चाचणी समितीची स्थापना करण्यात आली. या समितीने सहा कंपन्यांकडून ई-रिक्षांची तांत्रिक तपासणी व प्रत्यक्ष चाचणी घेऊन त्याबाबतचा अहवाल रायगड जिल्हाधिकारी यांना सादर केला होता. या अहवालानुसार महेंद्रा इलेक्ट्रिक मोबिलिटी यांच्याकडील तीन अधिक एक आसन क्षमतेच्या मॉडेलची चाचणी यशस्वी पूर्ण केली आहे. परीक्षण कालावधीत सात ई-रिक्षांची चाचणी घेण्यात येणार आहे. या ई-रिक्षांची नोंदणी माथेरान गिरिस्थान नगर परिषदेच्या नावे केली जाणार आहे. प्राधिकरणाच्या २६ सप्टेंबर रोजीच्या बैठकीतील सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्याच्या अनुषंगाने माथेरान परिसरामध्ये या ई-रिक्षा बॅजधारक चालकांकडूनच चालविल्या जाणार असल्याचे मुंबई महानगर क्षेत्र प्राधिकरणाचे सचिव भरत कळसकर यांनी सांगितले.