
दरोडा टाकण्यास आलेल्या चोरांना फिल्मी स्टाईलमध्ये अटक
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ : मुंबईच्या मालाडमधील दिंडोशी परिसरात एका शॉपिंग सेंटरवर दरोडा टाकण्यासाठी आलेल्या तीन आरोपींना फिल्मी स्टाईलमध्ये पोलिसांनी अटक केली.
दरोडेखोर अंधेरी येथून ऑटो रिक्षा चोरून शॉपिंग मॉलमध्ये दरोडा टाकण्यासाठी आले होते. अफजल अस्लम खान उर, आरिफ शफी अहमद अन्सारी, विघ्नेश व्यंकटेश देवेंद्र अशी अटक आरोपींची नावे आहेत. सर्व अटक आरोपींवर दरोडा, चोरी, प्राणघातक हल्ला आणि खंडणीचे ५० हून अधिक गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याकडून धारदार शस्त्रे, चोरीचे दोन मोबाईल फोन आणि चोरीची ऑटो रिक्षाही जप्त करण्यात आली आहे.
नागरी निवारा परिसरात असलेल्या अलंकार शॉपिंग सेंटरवर दरोडा टाकण्याच्या उद्देशाने या तिन्ही दरोडेखोरांनी मध्यरात्री अंधेरी येथून ऑटो रिक्षा चोरली होती. दिंडोशीतील नागरी निवारा परिसरात आल्यानंतर हे सर्व आरोपी लुटण्याच्या बेतात असताना तेथे उपस्थित काही लोकांना संशय आला. ही माहिती दिंडोशी पोलिसांना देण्यात आली. दिंडोशी पोलिस पथकाने तातडीने शॉपिंग सेंटरबाहेर सापळा रचला. दरोडेखोर मॉलजवळ पोहोचताच लुटलेला मुद्देमाल घेऊन पोलिसांनी त्यांना घेरले; मात्र आरोपी तेथून पळून जाण्यात यशस्वी झाले. नंतर पोलिसांनी अगदी चित्रपटात दाखवतात तसे फिल्मी स्टाईलमध्ये चोरांचा अंधेरीपर्यंत पाठलाग केला. अखेरीस तेथून त्यांना अटक करण्यात आली.