मुंबई-गोवा महामार्ग धुळीने हैराण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबई-गोवा महामार्ग धुळीने हैराण
मुंबई-गोवा महामार्ग धुळीने हैराण

मुंबई-गोवा महामार्ग धुळीने हैराण

sakal_logo
By

माणगाव, ता. २९ (बातमीदार) : पावसाळ्यात खड्ड्यांच्या त्रासाने प्रवासी हैराण झाल्यानंतर आता पडणाऱ्या उन्हामुळे मुंबई-गोवा महामार्गावर धुळीचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे प्रवासी हैराण झाले असून त्याचे आरोग्य धोक्यात आली आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील काही ठिकाणी बांधकामे रखडल्यामुळे प्रवासी, वाहनचालकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. चौपदरीकरणात महामार्गावरील बांधकाम अपूर्ण असल्याने अनेक ठिकाणी वळणे दिली आहेत. या वळणांवर तात्पुरते खडीकरण केले असून वाहनचालक व प्रवासी चिखल, धुळीने हैराण होत आहेत. पावसामुळे मोठ्या प्रमाणात खड्डे पडून चिखल होत असल्याने दुचाकीस्वार, पादचाऱ्यांना अतोनात त्रास सहन करावा लागत आहे. वाहनचालकांनाही कसरत करून वाहने चालवावी लागतात. मात्र, काही दिवसांपासून ऊन पडू लागल्याने या वळणांवर मोठ्या प्रमाणात खडी बाहेर येऊन धूळ उडत आहे. या धुळीचा प्रवाशांसह वाहनचालकांना त्रास होत आहे. धुळीमुळे समोरील दृश्य दिसत नसल्याने अपघात होण्याची शक्यता असते. तसेच श्वसनाचा त्रास होत असल्याचे वाहनचालक, प्रवाशांनी सांगितले. गणेशोत्सवानंतर नवरात्रोत्सव सुरू झाला आहे. उत्सव काळात विविध रंगाचे कपडे घालून जाणाऱ्यांना मात्र धुळीमुळे हैराण झाले आहे.

ज्या ठिकाणी जास्त खड्डे पडलेले आहेत, तेथे डांबरीकरण कामाला सुरुवात होईल. गणपतीमध्ये केलेल्या दुरुस्तीच्या वेळेला टाकलेल्या भरावामुळे हा धुरळा उडत आहे.
- यशवंत घोटकर, प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरण

पावसाळ्यात मुंबई-गोवा महामार्गावरील वळणांवर खड्डे व चिखलाचा सामना करावा लागतो. या ठिकाणावरून अतिशय जपून वाहन चालवावे लागते. गेल्या काही दिवसांत ऊन पडू लागल्याने धुळीचा मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. त्यामुळे समोरचे काही दिसत नाही. अनेक वेळा दुचाकीस्वार घसरून अपघातही होत आहेत.
- प्रदिप लांगी, दैनंदिन प्रवासी, सुधागड

महामार्गावरील खड्डे, चिखल व धुळीमुळे त्रास होत आहे. वळणावर हे खड्डे व चिखल असल्याने अपघाताची शक्यता आहे .अतिशय जपून वाहन चालवावे लागते. लवकरच याची डागडुजी व्हावी.
- भरत काळे, दैनंदिन प्रवासी