ब्रिटिशकालीन पूल धोकादायक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ब्रिटिशकालीन पूल धोकादायक
ब्रिटिशकालीन पूल धोकादायक

ब्रिटिशकालीन पूल धोकादायक

sakal_logo
By

रोहा, ता. २९ (बातमीदार) ः
महाड सावित्री पूल दुर्घटनेनंतर राज्यातील मुख्य महामार्ग व अंतर्गत मार्गावरील पुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. राज्यातील सर्व पुलांचे स्ट्रक्चर ऑडिट करण्यात आले. नवे पूल उभारणीसह पुलांचे मजबुतीकरण करण्यासंदर्भात पावले उचलली गेली. मात्र आजही काही जुन्या पुलांवर धोक्याची घंटा वाजतेय. असाच एक जीर्ण पूल मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर अखेरची घटका मोजत आहे. कोलाड पुई गावानजीक असलेला महिसदरा नदीवरील ब्रिटिशकालीन पूल वाहतूक व प्रवासाच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक बनला आहे. हा पूल कोसळला तर मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प होईल.

मुंबई-गोवा महामार्गाच्या पनवेल ते इंदापूर या ८४ किमीच्या पहिल्या टप्प्याचे काम तब्बल १३ वर्षांपासून रेंगाळले आहे. अशातच या मार्गावरील पुलांची कामेही काही ठिकाणी ठप्प तर काही ठिकाणी कुर्मगतीने सुरू आहेत. महामार्गावरील कामे नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया, पनवेल यांच्या माध्यमातून होत आहेत.
पुई गावालगत पुलावरून दिवसरात्र प्रवासी वाहतुकीसह अवजड, ओव्हरलोड वाहतूक होत आहे. पूल अरुंद असल्याने वाहतुकीला वारंवार अडथळाही येतो. त्‍यामुळे पुलावर अपघाती घटनाही घटल्‍या आहेत.
पुलावरून वाहने जाताना हादरे बसतात. शिवाय मोठमोठे खड्डे पडले असून पुलाची एक बाजू खचली आहे. शिवाय ठिकठिकाणी तडेही गेले आहेत. पूल जीर्ण झाल्‍याने सळ्या बाहेर निघाल्‍याने मुख्य खांब कधीही कोसळण्याच्या स्‍थितीत आहे.
संबंधित प्रशासनाने दुर्घटना घडण्यापूर्वी उपाय योजना करावी. नवीन पुलाचे काम मजबूत व दर्जेदार बांधकाम करून प्रवासी व चालकांचा प्रवास सुखकर व सुरक्षित करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

मुंबई - गोवा महामार्गाचे काम सुप्रीम एजन्सीला दिले होते. एजन्सीचा ठेका रद्द केल्याने शासनाने ‘कल्याण टोल व्हे’ या नवीन एजन्सीची निवड केली. दरम्यान जुन्या एजन्सीने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतल्‍याने प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. त्‍यामुळे नवीन ठेकेदराला कामाची ऑर्डर देता येत नाही. महिन्याभरात प्रकरण निकाली लागण्याची शक्यता आहे.
- यशवंत घोटकर, प्रकल्‍प संचालक, महामार्ग

पूल धोकादायक बनला असून साधारण दहा वर्षांपूर्वी पुलाच्या बाजूला नवीन पुलाचे काम सुरू करण्यात आले. मात्र ते अद्याप रखडले आहे. पुल जीर्णावस्‍थेत असताना केवळ तात्‍पुरती मलमपट्टी केली जात आहे.
- संजय मांडलुस्कर, स्थानिक रहिवासी

दहा वर्षांत किती सरकार बदलले, मात्र महामार्ग आणि त्‍यावरील पुलाच्या समस्‍या ‘जैसे थे’ आहे. संबंधित अधिकारी, मंत्र्यांनी या मार्गावरून प्रवास करून बघा, तरच त्‍यांना जनसामान्यांच्या यातनांची जाणीव होईल.
- सिद्धार्थ गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते

सरकार जनतेचे व गतिमान असल्‍याचे वारंवार मुख्यमंत्री बोलतात. मग मुंबई- गोवा महामार्ग सुरक्षित कधी होणार? मुख्यमंत्री दिल्ली वारी करतात, त्यांनी मुंबई-गोवा महामार्गाचीही वारी करावी. समृद्धी महामार्ग व तळ कोकणातील रस्ते बनवायला चालना देताना मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण तसेच नवीन पुलांची कामे कधी पूर्ण होणार, याबाबतही स्‍पष्‍ट करावे.
- सुनील दळवी, स्थानिक नागरिक


रोहा ः मुंबई - गोवा महामार्गावरील कोलाड पुई येथील धोकादायक पुलाची डागडुजी करण्यात येत आहे.