नवरात्रीच्या उपवासाला हवी ऊर्जेची जोड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नवरात्रीच्या उपवासाला हवी ऊर्जेची जोड
नवरात्रीच्या उपवासाला हवी ऊर्जेची जोड

नवरात्रीच्या उपवासाला हवी ऊर्जेची जोड

sakal_logo
By

डोंबिवली, ता. २९ (बातमीदार) : शारदीय नवरात्रोत्सवात आदिशक्तीचा जागर करताना हजारो भक्त नऊ दिवसांचा उपवास करतात. या उपवासाला धार्मिकतेची जोड असली तरी शरीराच्या पचन व्यवस्थेला आराम मिळावा, हा त्यामागचा शास्त्रीय उद्देश आहे. पण अनेक वेळा चुकीच्या पद्धतीने केलेल्या उपवासामुळे भविष्यात अशक्तपणा, आजारपणाला सामोरे जावे लागण्याची शक्यता असते. म्हणूनच उपवास करताना घेतला जाणारा फलाहार हा सात्विक आणि ऊर्जेने परिपूर्ण असावा, असा सल्ला आहार तज्ज्ञांनी दिला आहे.
नवरात्रीमध्ये नऊ दिवस उपवास करताना काहीजण पहिल्या आणि शेवटच्या दिवशी एकवेळ जेवण करतात; तर काहीजण अळणी पदार्थ सेवन करतात. केवळ फळे खाऊन किंवा निर्जल उपवास करणाऱ्या भक्तांची संख्याही अधिक आहे. पद्धती अनेक असल्या तरी उपवास करताना आरोग्याची काळजी घेणेही तितकेच गरजेचे आहे. कारण उपवासात काहीजण एकादशी दुप्पट खाशी प्रमाणे चमचमीत, तेलकट पदार्थ खातात; तर काही जण पाण्याचा एक थेंबही घेत नाहीत. हे दोन्ही प्रकार आरोग्यासाठी तितकेच घातक असल्याचे आहारतज्ज्ञ अर्जुन काटे यांनी सांगितले. निर्जल उपवासामुळे डिहायड्रेशन, डोकेदुखी, चिडचिड, रक्तदाब, मूतखडा असे आजार होऊ शकतात, असे ते म्हणाले. नवरात्रीच्या उपवासात अनेक जण दूध आणि फळे यांचे एकत्रित सेवन करतात, पण शक्यतो दुधासोबत फळे खाणे टाळावे. कारण दूध नाशवंत असून त्यासोबत फळे खाल्यास पोटदुखीचा त्रास उद्भवू शकतो. दूध आणि फळे काही तासांच्या अंतराने खाल्ल्यास योग्य आहे. पूर्वीच्या काळी मनुष्‍याच्‍या शारीरिक हालचाली जास्त होत्‍या. त्यामुळे पित्ताचे प्रमाण कमी होते. पण आता लोकांच्या सवयी बदलल्या आहेत, व्यायाम होत नाही. त्यामुळे काहीजण वजन कमी करण्याचा उत्तम मार्ग म्हणूनही नवरात्रीत उपवास करतात, पण त्यामुळे भलतेच घडते. पित्ताचा त्रास सुरू होतो. त्यामुळे जर एकवेळ जेवण करत असाल तर त्याआधी थोडे पाणी प्यावे, शक्य असल्यास सलाड खावे, असा सल्‍ला आहारतज्ज्ञ काटे यांनी दिला आहे.

वरईच्या भाताने मासिक पाळीवर परिणाम
उपवासाला अनेक जण वरईचा भात खातात. एखाद्या दिवशी तो खाल्ल्यास हरकत नाही, पण सलग नऊ दिवस वरई खाल्ल्यास महिलांना मासिक पाळीचा त्रास उद्भवू शकतो. वरई उष्ण असल्याने अधिक रक्तस्राव, पित्ताचा त्रास बळावू शकतो.

उपवासात काय खाल?
उपवासात भाजलेले सात्विक पदार्थ घ्यावेत. शिंगाडा व राजगिरा या पदार्थांचे सेवन करावे. हे पदार्थ पचायला हलके असतात. त्यामुळे शरीराला कोणतेही नुकसान होत नाही. नवरात्रीत उपवासात रसदार फळे खाल्ल्याने शरीरात ऊर्जा राहील. उदाहरणार्थ संत्री, मोसंबी, कलिंगड तसेच सुका-मेवामध्ये प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजे यांचे भांडार आहे. सुका मेवा हा नवरात्रीच्या आहाराचा एक महत्त्वाचा भाग असल्याचे आहारतज्ज्ञ सांगतात. मकाना, शिकंजीही फायदेशीर आहे. तसेच पदार्थ करताना तेल न वापरता तो तुपात केल्यास अधिक उत्तम, असे आहारतज्‍ज्ञ अर्जुन काटे यांनी सांगितले.