नेरुळमध्ये वाहतूक कोंडीचा मनस्ताप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नेरुळमध्ये वाहतूक कोंडीचा मनस्ताप
नेरुळमध्ये वाहतूक कोंडीचा मनस्ताप

नेरुळमध्ये वाहतूक कोंडीचा मनस्ताप

sakal_logo
By

नेरूळ, ता. २९ (बातमीदार) ः नवी मुंबई शहरातील पदपथ, रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर फेरीवाले बेकायदेशीरपणे व्यवसाय करत आहेत. नेरूळ रेल्वेस्थानकाच्या पूर्व आणि पश्चिमेकडे हीच परिस्थिती असून पदपथांवरील अतिक्रमणामुळे अस्वच्छतेसोबतच वाहतूक कोंडीच्या समस्येला सामोरे जाण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.
नेरूळ स्थानकाकडे जाणाऱ्या चार रस्त्यांवरील पदपथांवर फेरीवाल्यांनी कब्जा केला आहे. रस्त्यालगतच बेकायदा भाजी-फूल विक्रेते, खाद्यपदार्थ विक्रीच्या गाड्या लावल्या जात आहेत. तसेच मासळी मार्केट देखील येथेच असल्यामुळे नेहमी वर्दळ असलेल्या या रस्त्यावर वाहतूक कोंडी होत असल्याने या मार्गावरून जाणाऱ्या एनएमएमटी बस सेवेला त्याचा फटका बसत आहे. शिवाय या फेरीवाल्यांमुळे खासगी रिक्षाचालकांनाही या रस्त्यावरून मार्ग काढणे अवघड झाले असून अपघातांच्या विविध घटनाही दररोज घडत आहेत. विशेष म्हणजे, परिसरातील फेरीवाल्यांवर दिवसभर महापालिका कर्मचाऱ्यांकडून कारवाईही केली जात आहे, पण सायंकाळी सातनंतर पुन्हा फेरीवाले व्यवसाय मांडत असल्यामुळे महापालिकेने गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.
------------------------------------------
पदपथांवर फेरीवाल्यांच्या अतिक्रमणामुळे चालणेही कठीण झाले आहे. त्यामुळे अनेकदा पदपथांचा वापर न करता मुख्य रस्त्यानेच वाट काढावी लागते. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे.
- विजय शिंदे, रहिवासी
------------------------------------------
अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई केली जाते, तसेच दंडही आकारला जातो. तसेच सायंकाळी प्रत्येक तासाला पालिकेचे पथक फिरत असते; परंतु पथक गेल्यानंतर फेरीवाले पुन्हा व्यवसाय मांडतात.
- बाबासाहेब कराडे, अधीक्षक, अतिक्रमण विभाग