नर्सिंग शिक्षकांना नियुक्ती मिळेना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नर्सिंग शिक्षकांना नियुक्ती मिळेना
नर्सिंग शिक्षकांना नियुक्ती मिळेना

नर्सिंग शिक्षकांना नियुक्ती मिळेना

sakal_logo
By

मुंबई, ता. २९ ः शासकीय नर्सिंग महाविद्यालयांमध्ये सिस्टर ट्यूटर (नर्सिंग शिक्षक) अर्थात पाठ्यनिर्देशिका या पदावर निवड होऊनही नियुक्ती मिळत नसल्याने गुणवत्ता यादीत आलेले १५१ उमेदवार संतप्त झाले आहेत. त्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला असून मंत्रालयात आत्मदहन करण्याची तयारी सुरू केली आहे. आज मंत्रालयात जाऊन आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या कार्यालयात निवेदन देण्यात आले.

गेल्या तीन वर्षांपासून सर्व शासकीय नर्सिंग महाविद्यालयांमधील नियुक्त्या प्रलंबित आहेत. मॅट मुंबई आणि मॅट औरंगाबाद यांनी अंतिम निकाल देऊनही सरळ सेवेने गुणवत्ता यादीत आलेल्या उमेदवारांना सरकारी कार्यालयात पुन्हा पुन्हा खेटे घालूनही नियुक्ती मिळत नसल्याची त्यांची तक्रार आहे. उमेदवारांचे म्हणणे आहे, की नर्सिंगमधील उच्चशिक्षण स्वतःच्या हिमतीवर घेऊन स्पर्धा परीक्षेत उत्तुंग यश मिळवूनदेखील शासनात नोकरी करण्याचे आमचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी सार्वजनिक आरोग्य संचालनालयात आम्हाला पुन्हा पुन्हा खेटे घालावे लागत आहेत. महाराष्ट्र शासनाच्या सचिवांनी तात्काळ नियुक्ती देण्याबाबतचे पत्र देऊनही त्यावर कार्यवाही झालेली नाही. आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी दिलेले आदेशही अधिकारी वर्ग मानायला तयार नाही. याबाबत आपण थेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडेसुद्धा तक्रार केली असल्याचे या उमेदवारांचे प्रतिनिधी वीरेंद्र गिऱ्हे यांनी सांगितले. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचेही त्यांनी सांगितले.
...
आंदोलनाला पर्याय नाही!
महाराष्ट्र शासनाच्या सचिव अर्चना वालझडे यांनी अतितात्काळ नियुक्तीचे पत्र दिले असूनही, आरोग्य मंत्र्यांनी आदेश दिलेले असूनही नियुक्ती मिळत नाही. सर्व संबंधितांना भेटून गाऱ्हाणे मांडले आहे. आता आंदोलन करण्याशिवाय पर्याय नसल्याचे या उमेदवारांचे म्हणणे आहे.
...