शीतलादेवी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शीतलादेवी
शीतलादेवी

शीतलादेवी

sakal_logo
By

भक्तांच्या मदतीला धावणारी शीतलादेवी
माहीमच्या मंदिरात दर्शनासाठी भाविकांची रीघ

प्रभादेवी, ता. २९ (बातमीदार) : पुरातन दगडी बांधकामाच्या टुमदार आणि कौलारू अशा ऐतिहासिक मंदिरातील शीतलादेवी मातेच्या तेजपुंज रूपाचे दर्शन घेण्यासाठी भक्तांची नवरात्रोत्सवानिमित्त माहीममध्ये गर्दी होत आहे. शीतलादेवी मंदिर परिसर रोजच भाविकांनी फुलून जात आहे. भक्तांच्या मदतीला धावणारी देवी म्हणून शीतलादेवीची ख्याती आहे.
नवरात्रोत्सवानिमित्त शीतलादेवीला सोन्याचा मुखवटा घालण्यात येतो. नऊ दिवस गोंड्याच्या फुलांच्या माळा अर्पण केल्या जातात आणि देवीला रेशीम साड्या परिधान केल्या जातात. शीतलादेवी मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त दररोज दीड ते दोन हजार भाविक दर्शनासाठी येतात. देवीवर असलेल्या त्यांच्या नितांत श्रद्धेमुळे वातावरण भक्तिमय होऊन जाते. पुरातन असलेल्या शीतलादेवी मंदिरात शांतादुर्गा, साईबाबा, गणपती, विठ्ठल-रखुमाई, शंकर आणि गजानन महाराजांची छोटी मंदिरे आहेत. पाषणाचा मुखवटा असलेल्या देवीच्या दर्शनासाठी भाविक दूरवरून मंदिरात येतात. काली, चंडिका किंवा महिषासूरमर्दिनी ही देवीची उग्र रूपे आहेत. या देवीचे रूप मात्र शीतल आहे. शीतलादेवीच्या नावावरूनच माहीम परिसरातील बस थांबा, तसेच मेट्रो स्थानके ओळखली जातात.
मंदिरात नवरात्रीतील नऊ दिवसांत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. दररोज सकाळी सनई-चौघडे वाजवले जातात. संध्याकाळी विविध मंडळांच्या महिलांचे भजन होते. रात्री आरती करण्यात येते. परिसरातील नागरिक त्यात मोठ्या प्रमाणात सहभागी होतात. सेलिब्रिटींकडूनही आरती केली जाते. अनेक ठिकाणांहून महिलांनी बनविलेला प्रसाद देवीला दाखवण्यात येतो, अशी माहिती जीएसबी टेम्पल ट्रस्टचे सचिव शशांक गुळगुळे यांनी दिली. पंचमी आणि अष्टमी महत्त्वाची मानली जाते. अष्टमीला अनेक जण होमात नारळ टाकण्यासाठी येतात. या वर्षी दसऱ्याच्या दिवशी खासदार राहुल शेवाळे हेलिकॉप्टरमधून मंदिरावर पुष्पवृष्टी करणार असल्याचे गुळगुळे यांनी सांगितले.

अशी आहे आख्यायिका
मुंबईतील माहीमच्या बेटावर सुमारे ५०० ते ६०० वर्षांपूर्वी काही भाविकांना शीतलादेवीचा पाषाणाचा मुखवटा सापडला. स्थानिकांनी देवीची स्थापना केली. एरवी काली किंवा महिषासूरमर्दिनीचे उग्र रूप घेणारी देवी इथे मात्र शीतल रूप धारण करते म्हणून ती शीतलादेवी या नावाने प्रसिद्ध पावली. १८७९ मध्ये गौड सारस्वत ब्राह्मण (जीएसबी) मंदिर व्यवस्थापनाने शीतलादेवी मंदिराच्या व्यवस्थापनाची जबाबदारी स्वीकारली. सौभाग्यवती या देवीची ओटी भरायला येते. त्यामुळे तिचे सौभाग्य चिरंतन राहते, अशी श्रद्धा सांगितली जाते.