सायन गांधी मार्केट घटनेनंतर मुंबईत कंटेनर प्रवेशबंदी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सायन गांधी मार्केट घटनेनंतर मुंबईत कंटेनर प्रवेशबंदी
सायन गांधी मार्केट घटनेनंतर मुंबईत कंटेनर प्रवेशबंदी

सायन गांधी मार्केट घटनेनंतर मुंबईत कंटेनर प्रवेशबंदी

sakal_logo
By

मुंबईत कंटेनर प्रवेशबंदी!
सायन गांधी मार्केटमधील अपघातानंतर हाईट बॅरिअर लागणार

किरण कारंडे ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई ता. २९ : सायन गांधी मार्केटमध्ये रेल्वे उड्डाणपुलाखाली आज पहाटे कंटेनर अडकून झालेल्या अपघाताची गंभीर दखल घेण्यात आली आहे. घटनेनंतर रेल्वेतर्फे मुंबईत कंटेनर बंदीसाठी पावले उचलण्याबाबत सुरुवात झाली आहे. मुंबईच्या प्रवेशद्वारालाच असलेल्या गांधी मार्केटमध्ये आता हाईट बॅरिअर लावण्यात येणार आहेत. त्यासाठी रेल्वेने पालिकेकडे परवानगी मागितली होती. पालिकेनेही त्यासाठी मंजुरी दिल्याने मुंबईत कंटेनरला प्रवेशबंदी होण्याची चिन्हे आहेत.

आज पहाटे घडलेल्या घटनेनंतर रेल्वे आणि पालिका अधिकाऱ्यांची एक बैठक पार पडली. बैठकीत सायन गांधी मार्केट परिसरात हाईट बॅरिअर बसवण्याची परवानगी रेल्वेतर्फे पालिकेकडे मागण्यात आली. पालिकेनेही ती मान्य केली, अशी माहिती एफ उत्तर विभागाचे सहायक आयुक्त गजानन बेल्लाळे यांनी दिली. त्यानुसार आता गांधी मार्केट परिसरात हाईट बॅरिअर लावण्यात येणार आहेत. परिणामी, कंटेनरसारख्या वाहनांना मुंबईत प्रवेश करता येणार नाही. याआधीही रेल्वेतर्फे कंटेनर वाहतुकीला मज्जाव करण्यासाठीची विनंती वाहतूक विभागाला करण्यात आली होती. त्यानंतरही आजचा प्रकार घडल्याचे निदर्शनास आले आहे. वाहतूक पोलिसांनी वेळीच कंटनेर वाहतुकीवर उपाययोजना केल्या असत्या तर आजचा प्रकार टाळता आला असता, असे बोलले जात आहे.

आधाही मोठी वाहने अडकून अपघात
सायन गांधी मार्केटमध्ये आधीही डबलडेकर बससह मोठ्या उंचीच्या वाहनांचा अपघात झाल्याचे समोर आले आहे. त्यानंतरच रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी वाहतूक विभागाला कंटेनर किंवा उंच वाहनांना प्रवेश करण्यासाठी मज्जाव करण्याची विनंती केली होती. किंग्ज सर्कलपासून जीटीबी नगरमध्ये जाणाऱ्या रेल्वे मार्गासाठीचा उड्डाणपूल गांधी नगरमध्ये आहे. सायन गांधी मार्केटच्या सखल भागात पावसाचे पाणीही साचते. यंदा पालिकेने तिथे पाणी साचू नये म्हणून पंपाच्या माध्यमातून उपसा करण्याची व्यवस्था केली आहे. त्यामुळे यंदा पाणी साचले नाही.

कोट
पुलाखाली कंटेनर अडकल्याच्या घटनेनंतर रेल्वेतर्फे पालिका अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात आली. बैठकीत हाईट बॅरिअरसाठीची परवानगी मिळावी अशी मुख्य मागणी होती. वाहतूक पोलिसांनाही हाईट बॅरिअर लावण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. पालिकेने त्यासाठीची परवानगी विभाग पातळीवर दिली आहे.
- उल्हास महाले, उपायुक्त (पायाभूत सुविधा), पालिका