केईएममध्ये वैद्यकीय अतिदक्षता विभाग सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

केईएममध्ये वैद्यकीय अतिदक्षता विभाग सुरू
केईएममध्ये वैद्यकीय अतिदक्षता विभाग सुरू

केईएममध्ये वैद्यकीय अतिदक्षता विभाग सुरू

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३० : पालिकेच्या केईएम रुग्णालयाचा विस्तार होत असताना आता नव्या वैद्यकीय अतिदक्षता विभागाची (मेडिकल इन्टेन्सिव्ह केअर युनिट- एमआयसीयू) भर पडली आहे. त्यामुळे रुग्णालय अद्ययावत झाले असून नव्याने ३० खाटांची भर पडली असल्याने रुग्णांच्या दृष्टीने ही सकारात्मक बाब आहे.

पालिका प्रशासनाच्या वतीने गुरुवारी केईएम रुग्णालयात वैद्यकीय अतिदक्षता विभाग आणि स्ट्रोक युनिटचे अनावरण करण्यात आले. आर्थिक दुर्बल गटातील, अधिक गंभीर रुग्णांच्या नातेवाईकांना अनेकदा पालिका रुग्णालयांमध्ये एमआयसीयूसाठी प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे पालिकेच्या किंग एडवर्ड मेमोरियल रुग्णालयाने आता त्यांचे वैद्यकीय अतिदक्षता विभाग मजबूत करण्याचा निर्णय घेतला आहे. अतिरिक्त खाटांच्या क्षमतेप्रमाणेच जम्बो कोविड केंद्रातील वैद्यकीय उपकरणेही रुग्णालयात आणण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे रुग्णसेवा अद्ययावत आणि सुलभ करण्याच्या दृष्टीने लाभदायी ठरणार असल्याचा विश्वास केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. रावत यांनी व्यक्त केला. गेल्या अनेक महिन्यांपासून या वॉर्डचे काम सुरू होते. अखेर तो पूर्ण झाला आणि आता रुग्णांसाठी या वॉर्डचा वापर होईल.

पालिकेच्या तीन प्रमुख रुग्णालयांमध्ये कायमच रुग्णसेवेचा ताण असतो. केवळ मुंबईतीलच नव्हे; तर उपनगर आणि राज्यभरातून रुग्णांचा ओढा असतो. त्यामुळे पालिका प्रशासनाकडे खाटांची क्षमता वाढवण्याचा प्रस्ताव विचाराधीन होता. त्याप्रमाणे आता नव्या एमआयसीयू युनिटमध्ये ३० खाटा आणि स्ट्रोक- पक्षाघाताच्या विभागात सहा खाटांची भर पडली आहे. या खाटांचा फायदा आपत्कालीन परिस्थितीत असणाऱ्या रुग्णांना होईल.
- डॉ. संगीता रावत,
अधिष्ठाता, केईएम रुग्णालय