शिवसेना संघर्षातून उभी राहिली ः खा. विचारे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवसेना संघर्षातून उभी राहिली ः खा. विचारे
शिवसेना संघर्षातून उभी राहिली ः खा. विचारे

शिवसेना संघर्षातून उभी राहिली ः खा. विचारे

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३० ः शिवसेनेच्या वृक्षाची सडलेली पाने गळून पडली आहेत. त्याला आता नवी पालवी तुमच्या रूपाने फुटली आहे. अशातच शिवसेना ही संघर्षातूनच उभी राहिली आहे. त्यामुळे खचून जाऊ नका, असा सल्ला ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांनी पदाधिकाऱ्यांना दिला. शिवसेना ठाणे जिल्हा शाखेच्या वतीने कोपरी, नौपाडा, चंदनवाडी, पाचपाखाडी, खोपट, महागिरी येथील सर्व पदाधिकारी व शिवसैनिकांचा विभागीय मेळावा नुरी बाबा दर्गा रोड येथील अनुराधा मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते.
आपल्या प्रभागातील मतदार यादी अत्यंत बारकाईने चाळून घ्या, नागरिकांशी थेट संवाद करायला सुरुवात करा, तसेच ज्या शिवसैनिकांनी आपल्या जीवाचे रान करून भगवा नेहमीच उंचावत ठेवला, त्यांच्यामुळे महापालिकेत शिवसेनेचा भगवा हा कायम फडकत राहिला; परंतु काही स्वार्थी राजकारण्यांनी शिवसेना पक्षाशी घात करून सत्ता मिळवली आहे व शिवसैनिकांना त्रास दिला आहे. शिवसेनेचे ठाणे व ठाण्याची शिवसेना, या ठाण्याच्या शिवसेनेला गद्दारीचा डाग लावण्याचा प्रयत्न या राजकारण्यांनी केला आहे. मुख्यमंत्री पदाच्या लालसेपोटी शिवसेना सोडून गेलेले महाराष्ट्रातील उद्योगधंदे हे भाजपच्या सोबतीने गुजरातला पाठवण्याचे काम करीत आहेत. त्यामुळे आपल्या तरुण पिढीला उपलब्ध होणारा रोजगार काढून घेण्याचे घाणेरडे काम सध्या या महाराष्ट्रात सुरू आहे; परंतु हे सर्व जनतेला हे माहिती आहे. त्यामुळे या गद्दारांना धडा शिकवलाच पाहिजे, असेही यावेळी त्यांनी सांगितले. या मेळाव्यासाठी शिवसेना उपनेत्या अनिता बिर्जे, संपर्कप्रमुख मधुकर देशमुख, जिल्हाप्रमुख केदार दिघे, प्रवक्ते चिंतामणी कारखानीस, शहर प्रमुख प्रदीप शिंदे, तसेच इतर शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.