मुंबईतील बस थांब्यावर ई-बाईक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईतील बस थांब्यावर ई-बाईक
मुंबईतील बस थांब्यावर ई-बाईक

मुंबईतील बस थांब्यावर ई-बाईक

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३० : शहरातील तब्बल १८० बस स्थानकांवर १ हजार ई-बाईक तैनात करण्यात येणार आहेत. संपूर्ण शहरातील पहिला आणि शेवटचा टप्पा जोडण्याच्या उद्देशानेच ई-बाईक सेवा सुरू करण्यात येणार आहे. ऑक्टोबर महिन्यापासून ही सेवा सुरू होणार आहे. मुंबईत पहिल्या आणि शेवटच्या टप्प्यापर्यंत ई बाईकची सेवा देणारा बेस्ट वाहतूक हा पहिला सार्वजनिक वाहतूक उपक्रम ठरणार आहे.

बेस्टने जून २०२२ पासून ई-बाईक सेवेची चाचपणी सुरू केली आहे. सार्वजनिक ठिकाणी या ई-बाईकच्या चाचणीसाठी ४० हजारांहून अधिक लोकांनी नोंदणी केली आहे. सुरुवातीला या ई-बाईक्स अंधेरी, विलेपार्ले, जुहू, सांताक्रूझ, खार, वांद्रे, माहीम आणि दादर याठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यानंतर शहराच्या उर्वरित भागात या बाईकचा विस्तार करण्यात येणार आहे. जून २०२३ पर्यंत या ई-बाईकचा ताफा एक हजारांवरून पाच हजार इतका करण्यात येणार आहे. बसमधून उतरणारे प्रवासी हे त्यांच्या इच्छितस्थळी जाण्यासाठी ई-बाईकचा वापर करू शकतात. या ई-बाईक स्टेशनवर वापरासाठी उपलब्ध होणार आहे.

वोगो कंपनीसोबत भागीदारी
बेस्टनेही प्रवासाचे विशेष नियोजन करत बसेस आणि ई-बाईकवरील फेऱ्या एकाच योजनेत समाविष्ट केल्या आहेत. त्यामुळेच बस प्रवासी संख्या वाढीसाठीही मदत होईल, असा बेस्टचा विश्वास आहे. लवकरच ही सेवा बेस्ट चलो ॲपसोबतही संलग्न करण्यात येणार आहे. वोगो या दुचाकी वाहन देणाऱ्या संस्थेसोबत भागीदारी तत्त्वावर ही सेवा बेस्टकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहे.