सेतू सहकाराचा सदर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सेतू सहकाराचा सदर
सेतू सहकाराचा सदर

सेतू सहकाराचा सदर

sakal_logo
By

सेतू सहकाराचा सदर
शरदचंद्र देसाई
वकील, सहकार न्यायालय

पुनर्विकास करारातील कलमे
बिल्डर बदलू शकतो का?

प्रश्न ः माझ्या परिचितांच्या सहकारी गृहनिर्माण संस्थेत पुनर्विकास प्रक्रिया चालू आहे. निविदा मागवल्यानंतर कायदेशीर प्रक्रियेनुसार विकसकाची निवड झाली. पुनर्विकास करारनाम्यातील कलमांच्या आधारे विकसकाची निवड झाली, त्या कलमांच्या ठरलेल्या बाबींमध्ये तो विकसक आता बदल करू इच्छितो आहे. पुनर्विकास करारामध्ये सभासदांना विस्थापित भाडे या मुद्याचा अंतर्भाव करू नये, अशी त्याची मुख्य मागणी आहे. भाडेकरार स्वतंत्र करू या, असे तो सुचवत असून त्याचे कारण म्हणजे पुनर्विकास कराराला लागणारे मुद्रांक शुल्क असल्याचे सांगतो. याविषयी मार्गदर्शन करावे.
- कमल मसूरकर, प्रभादेवी, मुंबई

उत्तर ः आपल्या संस्थेने प्रकल्प व्यवस्थापक (पीएमसी), तसेच कायदेविषयक सल्लागार यांच्याकडे प्रथम हा विषय नेला पाहिजे. याविषयी त्या दोन तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि त्यांच्याशी विचारविनिमय करणे आवश्यक आहे, कारण त्यांना तुमच्या कामाविषयी व्यवस्थित माहिती असण्याची शक्यता जास्त आहे. तुम्हाला जे काही करावयाचे आहे किंवा होण्याची शक्यता आहे ते त्यांच्याच माध्यमातून होणार आहे. त्यामुळे त्यांना या विषयांमध्ये ठेवणे व त्यांचे लेखी मत घेणे आवश्यक आहे. त्यांचे या विषयामधील लेखी मत घेऊन विकसकाचा प्रस्ताव व तज्ज्ञांचे लेखी मत हे सर्वसाधारण सभेपुढे ठेवावे व सभेच्या ठरावाने हा विषय हाताळावा.

याविषयी माझे मार्गदर्शन खालीलप्रमाणे राहील -
विकसकाच्या निवडीच्या प्रक्रियेमध्ये त्यांनी दिलेली बोली व इतर बाबींचा विचार करून त्याला निवडण्यात सभासदांनी कौल दिला व म्हणूनच त्याची निवड करण्यात आली. त्यामुळे त्याच्या बोलीमधील मान्य केलेल्या बाबी किंवा अटी-शर्ती बदलणे किंवा बदलण्याची मागणी करणे, हे सर्वथा अयोग्य व गैर आहे. अशा विकसकाच्या हेतूवर शंका घेण्यास वाव आहे. विकसक ज्या महत्त्वाच्या कलमांमध्ये बदल सुचवू पाहत आहे, ते सर्वथा अयोग्य आहे. सभासदांना विस्थापित काळामधील भाडे मिळणे, हा पुनर्विकास प्रक्रियेमधील अविभाज्य भाग आहे. तोच भाग या विकास करारामधून वगळल्यास सभासदांचे कायदेशीर हक्क व अधिकार कमी होण्याची शक्यता आहे. विकसकाने पुनर्विकासाची बोली देताना मुद्रांक शुल्क व इतर बाबींचा विचार करूनच स्वतंत्र बोली लावली आहे. त्यामुळे अशा विकसकाच्या नंतरच्या भूलथापांना सभासदांनी बळी पडू नये. पुनर्विकासात विकसकाने विस्थापित भाडे न दिल्यामुळे अनेक कुटुंबांची ससेहोलपट झाल्याचे आपण वर्तमानपत्रांमध्ये वाचत असतो. त्यामुळे निविदा, बोली, करारनामा यातून सदस्यांना मिळालेले हक्क, अधिकार हे विकसकाच्या भूलथापांना बळी पडून गमावू नये.

प्रश्न ः गृहनिर्माण संस्थेमधील माझ्या मित्राचे निधन झाले. त्याच्या पश्चात त्याच्या पत्नीला त्यांच्या सदनिकेसाठी संस्थेचे सभासद कसे करता येईल ?
- रेखा पाटील, रोहा.

उत्तर ः सहकारी संस्थेमधील सर्व सभासदांसाठी महाराष्ट्र सहकारी कायद्यान्वये नामनिर्देशन करण्याची व्यवस्था व तरतूद आहे. सर्व सभासदांनी त्यांच्या हयातीमध्ये शक्य तेवढ्या लवकर नामनिर्देशनपत्र संस्थेत सादर करून त्याची पोच घ्यावी. ही बाब अत्यंत महत्त्वाची आणि सभासदांच्या जिव्हाळ्याची आहे. सर्व सभासदांनी नामनिर्देशन पत्रे द्यावीत व दिलेली नसल्यास संस्थेचे शासकीय लेखापरीक्षक तसे शेरे त्यांच्या अहवालात लिहीत असतात. सर्वसाधारणपणे सभासद नामनिर्देशनाकडे दुर्लक्ष करतात व त्यांचा अचानक मृत्यू झाल्यास उर्वरित कुटुंबामधील व्यक्तींना कायद्याच्या अनेक विषयांना तोंड देण्यास भाग पाडतात. आपल्या मित्राने त्याच्या पत्नीच्या नावे नामनिर्देशन केले असल्यास, त्याच्या पत्नीच्या नावावर ते घर होण्याचा मार्ग सोपा व सोईस्कर आहे. संस्थेमध्ये नामनिर्देशित सभासद होण्याचा अर्ज, तसेच त्याच्या पतीने मृत्यूपूर्वी दिलेल्या नामनिर्देशन अर्जाची प्रत आणि आवश्यक ते दाखले व संस्थेच्या सभासद होण्यासाठी लागणारी प्रवेश शुल्क, तसेच पतीच्या मृत्यूचा दाखला सादर करून त्याच्या पत्नीला सभासद होता येईल; परंतु जर पतीने त्याच्या हयातीत नामनिर्देशन पत्र सादर केले नसल्यास त्याच्या पत्नीला, पतीचे वारसदार म्हणून सभासद होण्यास पात्र असल्याने अर्ज करता येईल. त्यासाठीचे पतीचे इतर वारस व त्या सदनिकेमध्ये काही वारसांचा अधिकार असल्यास त्यांचे ना हरकत पत्र, प्रतिज्ञापत्र, बंधपत्र इत्यादी कागदपत्रे सादर करून, तसेच प्रवेश फी भरून सभासद होता येईल. संस्थेच्या कार्यकारी मंडळाची भूमिका अशावेळी महत्त्वाची असते. कार्यकारी मंडळाने सहकार्याची भूमिका घेतल्यास मृत व्यक्तींच्या वारसास सभासद होण्यास विलंब लागत नाही, तसेच अनावश्यक त्रासही होत नाही.


सहकारी संस्था, सहकार कायदा याबाबतचे आपले प्रश्न पुढील ई-मेलवर पाठवावेत - Sharadchandra.desai@yahoo.in