उल्हासनगरात जलकुंभ जवळ असूनही परिसर तहानलेला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उल्हासनगरात जलकुंभ जवळ असूनही परिसर तहानलेला
उल्हासनगरात जलकुंभ जवळ असूनही परिसर तहानलेला

उल्हासनगरात जलकुंभ जवळ असूनही परिसर तहानलेला

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
उल्हासनगर, ता. १ ः यंदा मुबलक प्रमाणात झालेल्या पावसामुळे बारवी धरण दोनदा ओव्हरफ्लो झाले. असे असताना उल्हासनगरात जलकुंभ जवळ असूनही आजूबाजूचे अनेक परिसर तहानलेले आहेत. अशी खंत माजी स्थायी समिती सभापती दीपक (टोनी) सिरवानी यांनी पाणीपुरवठा विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता दीपक ढोले यांच्याकडे व्यक्त केली.
उल्हासनगरमध्ये पालिकेचे मोठ्या क्षमतेचे १४ जलकुंभ असून त्यापैकी एक कॅम्प नंबर तीनमधील आनंद नगरात आहे. या जलकुंभाची पाण्याची क्षमता २७ लाख दशलक्ष लिटर आहे. या जलकुंभातून शेवटचे टोक असलेल्या वडोलगाव, गोदावरी नगर, अयोध्या नगर, अशोक नगर, फॉलवर लाईन आदी परिसरातही पाणीपुरवठा होतो. मात्र या भागात वेळेवर पाणी येत नाही. शिवाय कमी दाबाचे असल्याने या परिसरांसह इतर भाग हे तहानलेले राहत आहेत, अशी खंत दीपक सिरवानी यांनी व्यक्त केली.
उल्हासनगर शहराची लोकसंख्या २०११ मध्ये ५ लाख नोंद करण्यात आली होती. मात्र या ११ वर्षांत लोकसंख्या ही १० लाखाच्या आसपास असण्याची शक्यता आहे. मात्र पालिका जुन्या लोकसंख्येनुसार पाणीपुरवठा करत असून त्यात आता वाढ करण्याची गरज आहे. याशिवाय पाण्याच्या लाईनीतून गळती आणि अनधिकृत नळजोडण्या वाढल्या आहेत. त्यावर पालिका आयुक्त अजीज शेख यांनी तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना द्यावेत, असे सिरवानी यांनी सांगितले.
काही दिवसांपूर्वीच पाण्यासाठी शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे, शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, माजी उपमहापौर धनंजय बोडारे यांच्या नेतृत्वाखाली पालिकेवर मोर्चा काढण्यात आला होता. आता माजी स्थायी समिती सभापती सिरवानी यांनी जलकुंभाजवळील परिसर तहानलेले असल्याची खंत व्यक्त केल्याने पालिकेची पाणीपुरवठा सुरळीत करण्याची जबाबदारी वाढली आहे.

कोट
पालिकेला एमआयडीसीकडून पाणीपुरवठा होतो; मात्र पाण्याच्या वेळेत विद्युतपुरवठा बंद झाल्यावर जलकुंभ भरण्यास अडचण निर्माण होते. त्याचा परिणाम वितरणावर होत असून कमी दाबाने पुरवठा होत आहे. आयुक्त अजीज शेख, पाणीपुरवठा उपायुक्त डॉ. सुभाष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपाययोजना सुरू आहेत.
- दीपक ढोले, प्रभारी कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग