निसर्गप्रेमींना इंद्रधनुष्याची पर्वणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निसर्गप्रेमींना इंद्रधनुष्याची पर्वणी
निसर्गप्रेमींना इंद्रधनुष्याची पर्वणी

निसर्गप्रेमींना इंद्रधनुष्याची पर्वणी

sakal_logo
By

माणगाव (बातमीदार) : परतीच्या पावसामुळे अनेक दिवसांपासून आकाशात इंद्रधनुष्य निर्माण होत आहे. डोळ्यांना सुखावणारा नजारा पाहण्यात अबालवृद्ध हरखून जात आहेत.
परतीचा पाऊस सुरू झाला असून गेले काही दिवस ढगाळलेल्या वातावरणासह ऊन-पावसाचा खेळ सुरू आहे. अशा वातावरणात सकाळ, सायंकाळी सूर्यास्ताच्या पूर्वी अवकाशात इंद्रधनुष्य निर्माण होत आहेत. उन्हाची तिरीप व सूर्याच्या विरुद्ध दिशेला दिसणारे इंद्रधनुष्य असे विलोभनीय दृश्य जिल्ह्याच्या अनेक भागांत दिसत आहे. सूर्याची किरणे पावसाच्या थेंबावर पडतात, तेव्हा त्या किरणांचे विस्थापन होते. त्यामुळे सप्तरंग तयार होतात. या विक्षेपणात प्रकाशाच्या किरणांचे परावर्तन आणि अपवर्तन असते.
इंद्रधनुष्य सकाळी पश्चिमेला आणि सायंकाळी पूर्वेला दिसते. साधारणपणे अवकाशात एका वेळी एक, तर क्वचित वेळी दोन इंद्रधनुष्य दिसतात. पौराणिकतेनुसार देवांचा राजा इंद्र याचे धनुष्य म्हणजे इंद्रधनुष्य असे म्हटले जाते. इंद्रधनुष्य अनेक प्रकारची असली तरी संपूर्ण गोलाकार दुर्मिळ योग समजला जातो. त्याला ''इंद्रवज्र'' असे म्हणतात. प्रत्येक इंद्रधनुष्य पूर्ण गोल असते; मात्र क्षीतिजामुळे ते अर्धगोल दिसते. पावसाचे थेंब, त्याची दिशा, अंतर आणि वेगावर त्याचे दिसणे अवलंबून असते.
परतीच्या पावसातील इंद्रधनुष्याचा नजारा आपापल्या भ्रमणध्वनीत, कॅमेरामध्ये टिपण्यासाठी अनेक हौशी, निसर्गप्रेमी, पर्यटक इंद्रधनुष्य दिसतात. निसर्गाचा हा चमत्कार पुढील काही दिवस दिसेल, असे निसर्गप्रेमी, विज्ञान अभ्यासक सांगतात.

काही दिवसांपासून अनेक वेळा आकाशात इंद्रधनुष्य दिसत आहेत. अतिशय सुंदर दिसणारे हे दृश्य कॅमेऱ्यात टिपून घेणे आनंदाचे असते. दुर्मिळ योग असल्याने हे दिसताच आनंद होतो.
- नरेंद्र पेणकर, निसर्गप्रेमी

इंद्रधनुष्य पडणे हे नैसर्गिक आहे. प्रकाशाच्या परावर्तनामुळे हे होत असते. यात सात रंग असून ते क्रमाने असतात. सूर्याच्या विरुद्ध दिशेला ते पडते. पावसाळ्यात ही बाब नित्याची असते.
- अमोल तोडकर, विज्ञान शिक्षक