आगरी बांधवांच्या रामको बाळ मित्रमंडळाचा आरोग्य सेवेसाठी पुढाकार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आगरी बांधवांच्या रामको बाळ मित्रमंडळाचा आरोग्य सेवेसाठी पुढाकार
आगरी बांधवांच्या रामको बाळ मित्रमंडळाचा आरोग्य सेवेसाठी पुढाकार

आगरी बांधवांच्या रामको बाळ मित्रमंडळाचा आरोग्य सेवेसाठी पुढाकार

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ : खार रोड येथील नारळी आग्रीपाडा १९ वा रस्ता येथे गेली १६ वर्षे आगरी बांधव शारदीय नवरात्रोत्सवात देवीची स्थापना करत आहेत. रामको बाळ मित्र मंडळातर्फे २००८ साली लहान मुलींच्या आग्रहाखातर मंडळातील थोरा-मोठ्यांनी देवीची स्थापना केली होती. तेव्हापासून आतापर्यंत या मंडळांतील तरुण सदस्य या देवीची अखंड मनोभावे पूजा-अर्चा करत आहेत. ही देवी नवसाला पावते, अशी श्रद्धा आगरी बांधवांची आहे. नवरात्रीत नऊ दिवस देवीला वेगवेगळ्या प्रकारे वेशभूषा केली जाते.

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सर्वांनी एकत्र यावे, यासाठी नऊ दिवस गरब्याव्यतिरिक्त वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. नऊ दिवस अखंड पूजा आणि होम हवन करून देवीसाठी जागरण केले जाते. केळी आणि गव्हाचे पीठ व साखर या पदार्थांपासून तयार झालेले केळीचे शिखरण आगरी समाजाकडून देवीला नैवेद्य म्हणून दाखवले जाते. कोरोनानंतर आरोग्य हीच खरी संपत्ती असल्याचे प्रत्येकालाच जाणवू लागले. त्यानंतर गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवातही आरोग्यासाठी वेगवेगळे उपक्रम हाती घेतले आहेत. दंत चिकित्सा, ज्येष्ठांसाठी आरोग्यविषयक तपासण्या, इतर सामाजिक कार्यक्रमांसह हे मंडळ यंदाही नवरात्रीत आरोग्य सेवेच्या जागर करत आहे.

रामको बाळ मित्र मंडळाचे अध्यक्ष प्रशांत फुलारे यांनी सांगितले की, कोरोनानंतर ही पहिलीच नवरात्र अगदी धुमधडाक्यात साजरी केली जात आहे. मंडळात ज्येष्ठांच्या सहभागाने तरुण मंडळी उत्साहाने अनेक उपक्रमांत पुढाकार घेतात. यंदाही आरोग्य शिबिरे राबवण्यात येत आहेत.