वारली पेंटिंगचे तरुणाईमध्ये हीट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वारली पेंटिंगचे तरुणाईमध्ये हीट
वारली पेंटिंगचे तरुणाईमध्ये हीट

वारली पेंटिंगचे तरुणाईमध्ये हीट

sakal_logo
By

संदीप साळवे : जव्हार

पालघर जिल्ह्यातील अतिदुर्गम भाग आणि आदिवासी लोकवस्ती असलेला जव्हार तालुका हा स्थानिक पातळीवरील रोजगाराविषयी नेहमीच चर्चेत राहिला आहे. येथील असंख्य समस्या येथील जीवनशैलीच्या विकासाला बाधित ठरत आहेत. मात्र येथील काही युवकांनी यावर वारली पेंटिंग कला आत्मसात करत वेगवेगळ्या प्रकारच्या वारली पेंटिंग कलाकृती तयार करत आहेत. तसेच हे तरुण वारली पेंटिंगवर आधारित टॅटू तरुणाईमध्ये लोकप्रिय करत आहेत. या माध्यमातून येथील तरुणांनी बेरोजगारीला बगल देत आपल्यासाठी रोजगाराचे नवे दाखल खुले केले आहे.
जव्हार, मोखाडा या आदिवासी तालुक्यांत जवळपास १०० हून अधिक आदिवासी वारली पेंटिंग कलाकार वेगवेगळ्या प्रकारच्या वारली पेंटिंग बनवून विक्री करत असून रोजगाराला गती प्राप्त होत आहे. तसेच जव्हारमधील ३० आदिवासी तरुणांनी गोव्यात जाऊन टॅटू कसे काढावे याचे शिक्षण घेतले आहे. यानंतर या तरुणांनी आदिवासी संस्कृती दर्शवणारी वारली चित्रकला आणि टॅटू मेकिंग याचा कौशल्याने वापर करत वारली चित्रकलेवर आधारित टॅटू काढत आहेत. त्यामुळे वारली टॅटूमधून या आदिवासी तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळाला आहे. वारली चित्रकलेवर आधारित या टॅटूंची लोकप्रियता वाढत असल्याचे नरेश कुवरे या तरुणाने सांगितले.
आदिवासी वारली हस्तकला, पहाडी भवन वारली पेंटिंग हस्तकला, वारली चित्रकार, अशी जव्हार शहराच्या ठिकाणी स्टुडिओ व खेडोपाड्यांत त्यांनी स्वत:च्या घरात वारली पेंटिंगचा व्यवसाय सुरू केला आहे, असे प्रदीप वारघडे या तरुणाने सांगितले.

यावर केली जाते कलाकुसर
कॅन्व्हॉस पेंटिंग, लाकडी फ्रेम, पेन स्टॅन्ड, किचेन, वॉल हँगिंग, ट्रे अशा वस्तूंसह टी-शर्ट, बेडशीट, ओढणी, पंजाबी ड्रेस, साडी अशा विविध प्रकारच्या कपड्यांवर ऑर्डरप्रमाणे वारली पेंटिंग केली जात आहे.

तरुणांना नवा पर्याय खुला
थंड हवेचे उंच ठिकाण असल्यामुळे जव्हारला मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखले जाते. त्यामुळे पर्यटनस्थळातून काही प्रमाणात मोजक्या हॉटेल, धाबे व्यावसायिकांना रोजगार मिळतो; परंतु अन्य हजारो तरुण रोजगारापासून वंचित आहेत. त्यामुळे त्यांना रोजगारासाठी स्थलांतरित व्हावे लागते. मात्र या वारली पेंटिंग व टॅटू मेकिंगच्या माध्यमातून आदिवासी तरुणांना एक हक्काचे रोजगाराचे साधन निर्माण झाले आहे.
....
मुंबई, ठाणे, नाशिक या शहरांतून मोठ्या प्रमाणात आमच्या कलाकृतींना मागणी आहे. आम्ही आलेल्या ऑर्डरनुसार कामे करून देत आहोत. यामुळे आम्हाला रोजगाराचे नवे दालन खुले झाले असल्याचे वारली चित्रकार प्रदीप वारघडे याने सांगितले.
.....
जव्हार तालुक्यात पर्यटक आल्यानंतर वारली पेंटिंगबाबत आवर्जून माहिती घेतात. बऱ्याचदा वारली चित्र किंवा वारली चित्रकलेवर आधारित इतर वस्तू घेतल्यानंतर टॅटू काढण्यासाठीही पर्यटकांचा कल आहे. यात तरुणाईसह महिलांचा मोठा समावेश आहे.
- नरेश कुवरे, वारली टॅटू कलाकार