प्रशासनाचे लम्पीविरोधात दोन हात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रशासनाचे लम्पीविरोधात दोन हात
प्रशासनाचे लम्पीविरोधात दोन हात

प्रशासनाचे लम्पीविरोधात दोन हात

sakal_logo
By

मोखाडा, ता. १ (बातमीदार) : राज्यात जनावरांवरील लम्पी या साथरोगाने फैलाव केला आहे. पालघर जिल्ह्यातही लम्पीने बाधित जनावरे आढळून आली आहेत. मोखाडा तालुक्यात एका जनावराला लम्पीने घेरले होते. त्याचा प्रसार आणि फैलाव होऊ नये म्हणून प्रशासनाने तातडीने जनावरांचे लसीकरण सुरू केले. यात अवघ्या दहा दिवसांतच मोखाडा तालुक्यातील सुमारे १५ हजार जनावरांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे.
मोखाड्यात २०१९ च्या शिरगणतीनुसार २१,७१० जनावरे आहेत. पालघर जिल्ह्यात जनावरांवरील लम्पी हा साथरोग पसरत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या आजाराची संशयित तीन जनावरे मोखाड्यात आढळली होती. त्याचे नमुने तपासणीसाठी पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्यामध्ये एका जनावराला लम्पीची बाधा झाल्याचे आढळले होते. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली. या आजाराचा तालुक्यात फैलाव होऊ नये म्हणून जिल्हा परिषदेच्या पशुवैद्यकीय विभागाने तातडीने जिल्ह्यात जनावरांचे लसीकरण सुरू केले. यासाठी मोखाडा तालुक्याला १५ हजार डोस उपलब्ध झाले होते. मोखाड्यात २० सप्टेंबरपासून जनावरांचे लसीकरण सुरू करण्यात आले. लसीकरण जलदगतीने व्हावे, म्हणून तालुका प्रशासनाने मनुष्यबळ वाढविले. जनावरांचे लसीकरण करण्यासाठी १३ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह एक निवृत्त अधिकारी, एक कंत्राटी कर्मचारी, तसेच तीन खाजगी लसीकरण करणारे कर्मचारी नियुक्त करून दहा दिवसांत १५ हजार जनावरांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे.
प्रत्यक्ष गोठ्यात जाऊन पाहणी
या लसीकरणाची पाहणी आणि माहिती जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे आणि गटविकास अधिकारी प्रकाश भोसले यांनी मोखाड्यात प्रत्यक्ष जनावरांच्या गोठ्यात जाऊन केली. तसेच जिल्हा परिषदेच्या सर्वच योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. दरम्यान, सात हजार जनावरांचे लसीकरण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे लशीची मागणी केली आहे. तसेच इतर तालुक्यांत अतिरिक्त अथवा शिल्लक लशीची माहिती घेऊन, तालुक्यास लस उपलब्ध करण्याचे प्रयत्न सुरू केले असल्याची माहिती तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन भालचिम यांनी दिली.
------
मोखाडा : जनावरांचे लसीकरण करताना कर्मचारी.