भाविकांच्या हाकेला धावणारी नायगावची ‘श्री चंडिका’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भाविकांच्या हाकेला धावणारी नायगावची ‘श्री चंडिका’
भाविकांच्या हाकेला धावणारी नायगावची ‘श्री चंडिका’

भाविकांच्या हाकेला धावणारी नायगावची ‘श्री चंडिका’

sakal_logo
By

प्रसाद जोशी : वसई

वसई तालुक्यातील नायगाव पूर्वेला चंद्रपाडा येथे अतिप्राचीन व पांडवकालीन चंडिका देवीचे स्थान डोंगरावर आहे. याठिकाणी भाविकांची नवरात्रोत्सवात मोठी गर्दी असते. या काळात भाविकांची कोणतीही गैरसोय निर्माण होऊ नये म्हणून ‘श्री चंडिका देवी न्यासा’कडून चोख व्यवस्था केली जात आहे. यंदा येथे ६८ वा नवरात्रोत्सव साजरा करण्यात येत आहे.
नवरात्रीच्या नऊ दिवस पहाटे काकड आरती, देवीचा साजशृंगार, प्रार्थना, पूजा व माळ चढवणे, आरती, सप्तशती पाठ वाचन, हरिपाठ मंडळाचा हरिपाठ, धूपारती, विविध नाट्यमंडळांचे भजन, कीर्तन, सामुदायिक गरबा नृत्य असे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन श्री चंडिका देवी ग्रामदेवी न्यासातर्फे करण्यात आले आहे. मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी अन्नछत्राची व्यवस्था करण्यात आली असून भाविकांना डिजिटल माध्यमातून देवीचे दर्शन घेण्याचा लाभ मिळत आहे. या मंदिरात मुंबई, पालघर जिल्ह्यातून भाविक येत असल्याने स्वच्छतागृह, वाहनतळ व्यवस्था करण्यात आली आहे. पहाटे पाच वाजल्यापासून मंदिरात भक्तांची वर्दळ सुरू असते.
श्री चंडिका मातेचे मंदिर हे पांडवकालीन असून पांडव बारा वर्षे अज्ञातवासात असताना त्यांनी ठिकठिकाणी परिक्रमा केली. या बारा वर्षांच्या अज्ञातवासात त्यांनी अनेक मंदिरांची निर्मिती केली आहे. त्यापैकीच श्री चंडिका मातेचे मंदिर हे एक आहे. अरण्यात असल्यामुळे त्यांनी आपल्या अज्ञातवासाचे अनेक दिवस त्या मंदिरात काढले, अशी आख्यायिका आहे.
श्री चंडिकामातेच्या दगडी गुंफाच्या गाभाऱ्याजवळ एक भुयार आहे. मंदिरात जाण्यासाठी अडचणीची गर्द काट्याकुट्यातून जाणारी पाऊलवाट होती, मात्र याठिकाणी ग्रामस्थांनी मंदिराचा विस्तार केला असून येणाऱ्या भाविकांना चांगल्या सुविधा निर्माण केल्या आहेत.


देवीला पाच नारळांची तळी
चंडिकामातेच्या मंदिरात बळी देण्याची प्रथा नाही. देवीला फक्त पाच नारळाची तळी, खणा-नारळाची ओटी अर्पण केली जाते. नायगाव पूर्वेकडील चंद्रपाडा, जूचंद्र, कामण, बापाणे, राजावली, टीवरी यासह आजूबाजूच्या गावांतील लहानग्यांपासून ते अगदी ज्येष्ठ नागरिक पायऱ्या चढून डोंगरावर वसलेल्या देवीच्या दर्शनाला येत असतात.

निसर्ग सौंदर्याची मनाला भुरळ
मंदिरात जाताच निसर्गरम्य निसर्गसौंदर्य मनाला भुरळ घालते. मंदिरातील वैशिष्ट्य म्हणजे श्री चंडिका, श्री कालिका व श्री महिषासुरमर्दिनी या तीन देवतांच्या मूर्तींचा अपूर्व संगम या ठिकाणी पाहावयास मिळतो. त्यामुळे आपसुकच कुलस्वामीनी श्री चंडिका देवीचे दर्शन घेण्यासाठी दूरहून नागरिकांची पावले याठिकाणी वळत असतात.
--
समाजकार्यातही अग्रेसर
मंदिरात प्रत्येक पौर्णिमेला भंडाऱ्याचे आयोजन करण्यात येते. तसेच रांगोळी व इतर कलाकारांना त्यांच्या कलेला वाव मिळावा म्हणून न्यासाच्या वतीने प्रोत्साहन दिले जाते; तर देवीच्या यात्रोत्सवाला हजारोंच्या संख्येने याठिकाणी गर्दी होत असते. आर्थिक दुर्बल घटकाला मदत करण्यासाठी मंदिर देवस्थान अग्रेसर असते. त्यामुळे सामाजिक एकोपा व धार्मिकतेची ओढ असा संगम येथे पाहावयास मिळतो, असे येथील ग्रामस्थ विश्वजीत पाटील यांनी सांगितले.