उत्पन्नाच्या दाखल्यासाठी करा अर्ज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उत्पन्नाच्या दाखल्यासाठी करा अर्ज
उत्पन्नाच्या दाखल्यासाठी करा अर्ज

उत्पन्नाच्या दाखल्यासाठी करा अर्ज

sakal_logo
By

नवीन पनवेल, ता. ३ (वार्ताहर) ः उत्पन्नाच्या दाखल्यासाठी रेशन कार्ड बंधनकारक करण्यात आले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रवेश, रुग्णांसाठी वैद्यकीय योजना, तसेच कर्ज मंजुरीसाठी अडथळे निर्माण होत होते. मात्र, शिवसेना शिंदे गटाकडून याबाबतचे एक निवेदन तहसीलदारांना देण्यात आल्यानंतर हा अडथळा दूर झाल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
तहसील कार्यालयाकडून वेगळ्या प्रकारचे दाखले दिले जातात. त्यामध्ये उत्पन्नाचा दाखला अत्यंत महत्त्वाचा समजला जातो. विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या कॉलेजमध्ये प्रवेश घेण्याकरता तसेच शिष्यवृत्तीसाठी सुद्धा उत्पन्नाच्या दाखल्याची गरज आहे. पनवेल तहसील कार्यालयाकडे यासाठी अनेक पालकांनी अर्ज केले आहेत. मात्र, नव्याने पदभार घेतलेल्या नायब तहसीलदारांकडे उत्पन्नाच्या दाखल्यासाठी रेशन कार्ड बंधनकारक केले होते. त्यामुळे अनेकांची शिधापत्रिका ही मूळ गावी असल्याने तर काहीजण मुंबई येथून पनवेलला स्थलांतरित झाल्यामुळे मुंबईतच रेशन कार्ड असल्याने अडचणींचा सामना करावा लागत होता. अशातच प्रवेशाची मुदत संपत आली असतानासुद्धा संबंधित विद्यार्थ्यांना उत्पन्नाचा दाखला दिला जात नव्हता. याशिवाय वैद्यकीय सुविधेबरोबर अन्य योजनेचा लाभ घेण्यातही अडचणी येत असल्याने याबाबत लाभार्थ्यांमधून नाराजीचा सूर उमटत होता.

शिंदे गटाच्या पाठपुराव्याला यश
उत्पन्नाच्या दाखल्यासाठी रेशन कार्ड बंधनकारक करण्यात आल्याने विविध अडचणी येत होत्या. यासंदर्भात माजी नगरसेवक शिवाजी थोरवे यांच्याकडे अनेक तक्रारी आल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे पनवेल जिल्हा संपर्कप्रमुख रामदास शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली महानगरप्रमुख प्रथमेश सोमण, तालुकाप्रमुख रुपेश ठोंबरे, शिवाजी थोरवे या शिष्टमंडळाने पनवेल तहसील कार्यालयाला निवेदन सादर केले आहे. याबाबत सकारात्मक भूमिका घेण्याचे आश्वासन तहसीलदार विजय तळेकर यांनी दिल्यानंतर रेशन कार्डची अट शिथिल करून संबंधितांना उत्पन्नाचे दाखले देण्यात आले आहेत.