महापालिकेच्या आराखड्यावर सह्यांचा पाऊस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महापालिकेच्या आराखड्यावर सह्यांचा पाऊस
महापालिकेच्या आराखड्यावर सह्यांचा पाऊस

महापालिकेच्या आराखड्यावर सह्यांचा पाऊस

sakal_logo
By

जुईनगर, ता. ३ (बातमीदार) ः नवी मुंबई महापालिकेने शहराच्या विकास आराखड्यावर नागरिकांच्या हरकती व सूचना मागविल्या आहेत. यासाठी पालिकेने ६० दिवसांची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे नवी मुंबई शहरातील विविध भागांतून या विकास आराखड्याबाबतच्या सूचना नोंदवल्या जात आहेत. नवीन विकास आराखड्यात सानपाडा-जुईनगर जोड रस्त्यासाठी मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल करण्यात येणार आहे, पण जुईनगरमधील १,८०० नागरिकांनी स्वाक्षरी मोहिमेतून या प्रस्तावालाच विरोध केला आहे.
नवी मुंबई महापालिकेच्या स्थापनेनंतर तिचा स्वतःचा विकास आराखडा तयार करण्यात आलेला नाही. मात्र, आता पालिकेने प्रारूप आराखडा तयार केला असून यावर नागरिकांकडून सूचना व हरकती मागवण्यात आल्या आहेत. याच अनुषंगाने काही सामाजिक संस्थांच्या माध्यमातून सुरू असलेल्या जनजागृतीमुळे नागरिकांकडूनदेखील आराखड्याबाबतच्या हरकती व सूचना मांडण्यात येत आहेत. सानपाडा जुईनगरमधील प्रस्तावित पुलांसंदर्भातदेखील नागरिकांनी हरकती दाखल केल्या आहेत. या पुलांमुळे जवळपास १८०० झाडे तोडण्यात येणार असल्याने
या पुलाला विरोध करण्यात आला आहे. तसेच कांदळवनासह पर्यावरणासाठी आरक्षित जागेसाठीची सूचना मांडण्यात आली आहे. याशिवाय खेळासाठीच्या मैदानासोबत प्रारूप आराखडा मराठीत करण्यात यावा, अशी मागणीदेखील नागरिकांनी केली आहे.

कोट
पालिकेच्या विकास आराखड्याविषयी सानपाडा, बेलापूर, सीवूडसमध्ये जनजागृती केल्यानंतर जुईनगरमध्येदेखील अभियान राबवण्यात आले. यावेळी १८०० नागरिकांनी सह्यांच्या माध्यमातून विरोध दर्शविला आहे. तसेच ५ ऑक्टोबरला वाशीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात उपोषण करून आराखड्यातील त्रुटींकडे पालिकेचे लक्ष वेधणार आहे.
- निशांत भगत, समाजसेवक