वाहतूक पोलिसांची ‘ईचवन टीचवन’ मोहीम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाहतूक पोलिसांची ‘ईचवन टीचवन’ मोहीम
वाहतूक पोलिसांची ‘ईचवन टीचवन’ मोहीम

वाहतूक पोलिसांची ‘ईचवन टीचवन’ मोहीम

sakal_logo
By

भाईंदर, ता. ३ (बातमीदार) ः वाहनचालकांनी वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे यासाठी मिरा-भाईंदर वाहतूक पोलिसांनी ‘ईचवन टीचवन’ ही अनोखी मोहीम राबवण्यास सुरुवात केली आहे. प्रत्येक वाहनचालकाला वाहतुकीच्या नियमांची माहिती देणे, तसेच नियम पाळणाऱ्यांना प्रोत्साहन देणे हे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे.

संपूर्ण महाराष्ट्रात ‘वाहतूक सजगता सप्ताह २०२२’ ला सुरुवात झाली आहे. एक ऑक्टोबर ते आठ ऑक्टोबर २०२२ पर्यंत हा सप्ताह चालणार आहे. यादरम्यान उद्घाटन सोहळा, नो चलान डे, ब्लॅक स्पॉट जनजागृती, वॉकिंग प्लाझा, तणावमुक्ती शिबिर, रिफ्लेक्टर व हेल्मेट वाटप, बोर्ड, बॅनर-स्टिकर वाटून तसेच चित्रफीत प्रदर्शन करून शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे आदी कार्यक्रम राबवण्यात येत आहेत. त्याचबरोबर ‘ईचवन-टिचवन’ ही अनोखी मोहीमही राबवली जात आहे. मोहिमेअंतर्गत वाहनचालकांना इतरांनादेखील वाहतुकीच्या नियमांबद्दल माहिती देण्यास सांगण्यात आले आहे. यामुळे चूक करणाऱ्या वाहनचालकांचे मित्र व नातेवाईक यांनादेखील वाहतूक नियमांबद्दल माहिती मिळण्यास मदत होणार आहे. मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलिस आयुक्त सदानंद दाते, अप्पर पोलिस आयुक्त श्रीकांत पाठक, पोलिस उपायुक्त मुख्यालय विजयकांत सागर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवली जात आहे.

‘नो चलान डे’ची विशेष मोहीम
याच मोहिमेंतर्गत पोलिसांनी रविवारी ‘नो चलान डे’ ही विशेष मोहीमदेखील राबवली. यासाठी वाहतूक पोलिसांनी सकाळी ११ च्या सुमारास काशिमिरा उड्डाण पुलाखाली वाहतुकीच्या नियमांचे पालन करणाऱ्या वाहनचालकांचा गुलाब देऊन सत्कार केला. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना कोणताही दंड न लावता यापुढे वाहतूक नियमाचे पालन करू, अशी शपथ घेण्यास सांगण्यात आले. संपूर्ण दिवसभरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कोणत्याही प्रकारचा दंड आकारला गेला नाही.

वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांवर दररोज कारवाई केली जाते. मात्र जे दररोज न चुकता नियम पाळतात त्यांचा कायदा न तोडल्याबद्दल सत्कार करून त्यांना प्रोत्साहित केले. यामुळे यापुढे देखील ते वाहन चालवताना वाहतूक नियमांचे पालन करतील.
- रमेश भामे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वाहतूक शाखा