खारघर-तळोज्यात टॅंकरच्या फेऱ्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खारघर-तळोज्यात टॅंकरच्या फेऱ्या
खारघर-तळोज्यात टॅंकरच्या फेऱ्या

खारघर-तळोज्यात टॅंकरच्या फेऱ्या

sakal_logo
By

खारघर, ता. ३ (बातमीदार) : हेटवणे धरणातून पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास सापोली गावाजवळ फुटली आहे. या वाहिनीची अद्याप दुरुस्ती झाली नसल्याने तळोजा गाव, खारघर, उलवे, द्रोणागिरीत पाणीटंचाई निर्माण झाल्याने रहिवाशांवर टॅंकरचे पाणी घेण्याची वेळ आली आहे.
खारघर, तळोजा, उलवे आणि द्रोणागिरी नोडमध्ये सिडकोच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जातो. या विभागाला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी हेटवणे धरणापासून काही अंतरावरील एका गावानजीक फुटली आहे. ही जलवाहिनी शनिवार रात्रीपर्यंत दुरुस्त करून पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे सिडकोच्या पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले. मात्र, सोमवार दुपारपर्यंत हे काम अपूर्णच असल्याने गेल्या तीन दिवसांपासून तळोजा गाव, तसेच खारघरमधील सेक्टर दोन ते एकवीसमध्ये पाणी पुरवठा बंद आहे. त्यामुळे ऐन नवरात्रोत्सवात या विभागातील नागरिकांवर टँकरचे पाणी विकत घेण्याची वेळ आहे.
---------------------------------------------
आजार बळावण्याचा धोका
सिडकोच्या पाणीपुरवठा विभागाने मंगळवारी सकाळी पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे सांगितले आहे. तसेच पुढील दोन ते तीन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्यामुळे खारघर आणि तळोजावासीयांना टॅंकरच्या पाण्याशिवाय पर्याय नाही. मात्र, हे पाणी बोअरवेलचे तसेच दूषित असल्याने वातावरणातील बदलांमुळे सर्दी-तापाची सुरू असलेली साथ अधिक पसरण्याची भीती नागरिकांमध्ये आहे.
---------------------------------------------
खारघर सेक्टर बारा एफ टाईप परिसर गेल्या आठ दिवसांपासून पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहे. सिडको अधिकारी फोन उचलत नाहीत, ऑफिसमध्ये भेटत नाहीत. टँकरद्वारेदेखील पाणीपुरवठा करत नाही. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे.
- रवींद्र कटकदौंड, अध्यक्ष, टाईप ओनर्स वेल्फेअर असोसिएशन
-----------------------------------
तळोजा गावात तीन दिवसांपासून पाणी नाही. दुकानातील विकतचे शुद्ध पाणीदेखील मिळत नसल्यामुळे तळोजा ग्रामस्थांना बोअरवेल आणि टँकरचे पाणी प्यावे लागत आहे.
- फारुख पटेल, ग्रामस्थ
--------------------------------------------------
मोठी व्यासाची जलवाहिनी फुटल्यामुळे दुरुस्तीसाठी दोन दिवस लागले. सोमवारी सायंकाळपासून पाणी पुरवठा सुरू होईल. तसेच मंगळवारीही कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याने नागरिकांनी सहकार्य करावे.
-नानिक चोईथानी, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग, सिडको