उमेळेतील ‘श्री साकाई’ देवी भक्तांचे श्रद्धास्थान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उमेळेतील ‘श्री साकाई’ देवी भक्तांचे श्रद्धास्थान
उमेळेतील ‘श्री साकाई’ देवी भक्तांचे श्रद्धास्थान

उमेळेतील ‘श्री साकाई’ देवी भक्तांचे श्रद्धास्थान

sakal_logo
By

प्रसाद जोशी : वसई
वसई पश्चिम येथील उमेळे गावात साकाई देवीचे मंदिर आहे. देवीचे तेजस्वी व आकर्षक रूप असून दर्शनासाठी पालघर जिल्ह्यासह पुणे, नवी मुंबई, मुंबईसह आजूबाजूच्या परिसरातून भाविक येत असतात. भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या या मंदिरातून सामाजिक कार्यालादेखील हातभार लागत असतो हे विशेष म्हणावे लागेल.
वसईच्या सोपारा खाडीत १९२० साली देवीची मूर्ती आढळली. त्यानंतर या मूर्तीला ग्रामस्थांनी उमेळे गावात आणले. तेथे तिची विधीप्रमाणे पूजा केली व देवीचे मंदिर उभारण्याचा निश्चय केला. त्यानंतर १९३० साली मंदिर बांधण्यात आले. त्यानंतर साकाई देवीची मनोभावे पूजा-अर्चा करण्यास नागरिक रममाण होऊ लागले. सात भगिनीपैकी एक साकाई देवी आहे, अशी आख्यायिका आहे. गावातील मुलांच्या खेळांना प्रोत्साहन मिळावे म्हणून विविध खेळांच्या स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम केले जातात. तसेच महिलांसाठी हळदी-कुंकू अशा विविध कार्यक्रमांचे आयोजनदेखील केले जाते. याचबरोबर पूरग्रस्त भागाला मदतदेखील मंदिराकडून करण्यात आली आहे.
नवरात्रोत्सवात देवीचा साजशृंगार करण्यात येतो. अभिषेक, पूजा, साकाई देवीची आरती गायली जाते. त्याचबरोबर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये याची दक्षता घेण्यात येते, अशी माहिती ग्रामस्थ विवेक चौधरी यांनी दिली.
साकाई देवी मंदिर परिसरात यात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्यानिमित्ताने येथील नागरिक एकत्र येत सामाजिक एकोपा जपत आले आहेत. ग्रामदेवता साकाई देवीची मनोभावे पूजा करताना ग्रामस्थ सामाजिक भानदेखील जपत आहेत.
-------------
समाजोपयोगी उपक्रमांत सहभाग
नवरात्री सप्तमी व गांधी जयंतीला उमेळे ग्रामस्थ देवस्थान मंडळातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एकूण ९० इच्छुकांची नोंदणी झाली होती. विशेष म्हणजे महिलांनी रक्तदान करण्यास सहभाग नोंदविला. सामाजिक कार्यात येथील मंदिराचा नेहमी सहभाग असतो. कोरोना काळात मुख्यमंत्री सहायता निधीला मदत करण्यात आली. तसेच विविध समाजोपयोगी कार्यक्रम हाती घेतले जातात, अशी माहिती ग्रामस्थ विवेक चौधरी व आशीष वर्तक यांनी दिली.
-----------------
अशी आहे आख्यायिका
वज्रेश्वरी, जागमाता, चुळणाई, आनंदी, जीवदानी, शीतला यांची सातवी भगिनी उमेळे गावातील साकाई देवी आहे, अशी आख्यायिका सांगितली जाते. देवीची मूर्ती गावात आणताना ग्रामस्थांनी मोठ्या जल्लोषात वाजत-गाजत साकाईचे स्वागत करण्यात आले. चैत्र चतुर्दशीला येथे यात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. ग्रामस्थ एकवटत असतात, देवीचे गुणगान गात, सत्वर धाव घे आमच्या हाकेला, अशी प्रार्थना ग्रामस्थ करतात. उंबरगाव ते बदलापूर, मुंबई, नवी मुंबई येथील दैवज्ञ ब्राह्मण (सोनार) कुटुंबियांची साकाई देवी कुलस्वामिनी आहे. या भागातील भाविक नवरात्रात श्रध्देने देवीच्या दर्शनास येतात.
.....