आयुक्तांसह अधिकाऱ्यांचा झिंगाट डान्स | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आयुक्तांसह अधिकाऱ्यांचा झिंगाट डान्स
आयुक्तांसह अधिकाऱ्यांचा झिंगाट डान्स

आयुक्तांसह अधिकाऱ्यांचा झिंगाट डान्स

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

डोंबिवली, ता. ३ ः कल्याण-डोंबिवली महापालिकेचा वर्धापनदिन शनिवारी (ता. १) साजरा झाला. यानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या सांगताप्रसंगी पालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्यासह अधिकाऱ्यांनी झिंगाट गाण्यावर नृत्य केले. एकीकडे शहरात वाहतूक कोंडी, झाडे, कमानी कोसळण्याच्या घटना घडत असताना दुसरीकडे पालिका प्रशासकीय अधिकारी नृत्यात तल्लीन असल्याने समाज माध्यमांवर नागरिकांनी त्यांना चांगलेच ट्रोल केल्याचे पाहायला मिळत आहे. नृत्याचा व्हिडीओ समाज माध्यमावर व्हायरल होत असून ‘नागरिक समस्यांनी त्रस्त, राजकीय पदाधिकारी उत्सवात व्यस्त आणि प्रशासकीय अधिकारी मस्त’ अशी चर्चा शहरात रंगली आहे. केंद्रीय मंत्री कपिल पाटलांसह आमदार राजू पाटील यांनीही प्रशासन अधिकाऱ्यांचे हे वर्तन योग्य नसल्याची टीका केली आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिकेचा शनिवारी वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. यानिमित्त कल्याणमधील आचार्य अत्रे सभागृहात एका सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रम संपल्यानंतर उपस्थित सर्वच अधिकाऱ्यांनी झिंगाट गाण्याच्या ठेक्यावर नृत्य केले. आनंद व्यक्त करणे हे गैर नाही; परंतु शहरात एककीडे रस्त्यांवरील खड्ड्यांची समस्या तीव्र आहे. उत्सवानिमित्त उभारण्यात आलेल्या कमानी, झाडे वाऱ्यामुळे पडून दुर्घटना घडल्या असताना त्याकडे लक्ष न देता अधिकारी कार्यक्रमात, नृत्यात दंग असल्याने नागरिकांनी त्यांना चांगलेच ट्रोल केले आहे. शिवसेना सोडली तर सर्वच राजकीय नेते, पदाधिकाऱ्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या या वर्तनावर झोड घेतली आहे.

वर्धापन दिनाच्या निमित्ताने नृत्य करणे हे किती संयुक्तिक आहे. असे काही घडले असेल तर मी याविषयी आयुक्तांशी चर्चा करेन.
- कपिल पाटील, केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री

या शहराविषयी प्रशासकीय अधिकाऱ्यांना आस्था नाही, ते केवळ तीन वर्षे काम करतात आणि निघून जातात. रस्ते, पाण्याची समस्या आज शहरात तीव्र आहे. अधिकाऱ्यांनी प्राथमिक सोयी-सुविधा व्यवस्थित कराव्यात. तुमच्यासोबत आम्हीदेखील नाचायला तयार आहोत.
- प्रकाश भोईर, मनसे जिल्हा अध्यक्ष आणि माजी विरोधी पक्षनेते.

शहरात पाण्याचा प्रश्न तीव्र आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त आहेत. शहरवासीय आज अनेक समस्यांना, शारीरिक आजारांना तोंड देत आहेत. नागरिक अडचणीत असताना अधिकारी नाचून वर्धापन दिन साजरा करत आहेत.
- संतोष केणे, काँग्रेस नेते, माजी नगरसेवक

महापालिकेचे अधिकारी आपले कर्तव्य बजावित असताना आपला आनंद वर्धापनदिनी व्यक्त करण्याचा अधिकार नाही का? ट्रोल करणारे कोणत्याही गोष्टीवर ट्रोल करतात. खड्डे बुजविणे, रस्त्यांची कामे, शहर स्वच्छतेची आमची कामे सुरूच आहेत. खड्डे दरवर्षी पडतात. पावसामुळे या कामात व्यत्यय येतो, पण काम करत आहोत. पालिका प्रशासनासह शहरात सर्वत्र हा दिवस आनंदात साजरा होणे आवश्यक आहे.
- डॉ. भाऊसाहेब दांगडे, आयुक्त