मनोर-चिंचोटी अपघातप्रवण क्षेत्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मनोर-चिंचोटी अपघातप्रवण क्षेत्र
मनोर-चिंचोटी अपघातप्रवण क्षेत्र

मनोर-चिंचोटी अपघातप्रवण क्षेत्र

sakal_logo
By

वसई, ता. ३ (बातमीदार) : पालघर जिल्ह्यातील मुंबई-अहमदाबाद महामार्गावर मनोर ते चिंचोटी या भागात अडीच वर्षांत साडेचारशे अपघाताच्या घटना घडल्या आहेत. यात किरकोळ जखमी, गंभीर दुखापत व काही नागरिकांना मृत्यूला सामोरे जावे लागले. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग असुरक्षित असून नियमांचे उल्लंघन व अनेक समस्यांमुळे दुर्घटना वाढत आहेत, तरी याकडे राष्ट्रीय प्राधिकरण विभाग व लोकप्रतिनिधींनी लक्ष घालण्याची गरज निर्माण झाली आहे.
महामार्गालगत मनोर भागात बोईसरसह पालघरमधील औद्योगिक पट्टा येतो. विरार, नालासोपारा, वसई, कामण मार्ग ते चिंचोटी अशा जोडल्या गेलेल्या मार्गावरून भिवंडी, ठाणे, वरसावे पूल असा प्रवास होत असतो. मनोर व चिंचोटीदरम्यान औद्योगिक वसाहतीचा भाग अधिक आहे. त्यामुळे या ठिकाणाहून अवजड वाहनांची संख्या अधिक आहे. त्याचबरोबर महामार्गाला लागून असणाऱ्या गावातील नागरिक दुचाकी, चारचाकीने प्रवास करत असतात. मात्र या ठिकाणी सुविधा बोटावर मोजण्याइतक्या आहेत. महामार्गावर वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणतीही यंत्रणा नाही. उड्डाण पुलालगत पथदिवे अभाव, तर जेथे पथदिवे आहेत ते बंद आहेत. त्यामुळे अनेकदा हा परिसर अंधारात असतो. विशेष म्हणजे राष्ट्रीय महामार्ग असताना येथील विजेचे बिल थकीत झाल्यास बत्ती गुल होते.
मनोर व चिंचोटी भागात ब्लॅक स्पॉट म्हणजे अपघात प्रवण क्षेत्र म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. या भागात मृत्यू, जखमींची संख्या रोखण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून वाहने सावकाश चालवा असे फलक लावण्याशिवाय कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे २०२२ सालच्या सहा महिन्यांत ३९ जणांवर काळाने झडप घातली आहे. एकीकडे राष्ट्रीय महामार्ग सुरक्षित असेल, अशी आशा वाहनधारकांकडून बाळगली जाते. मात्र मनोर ते चिंचोटीदरम्यान प्रवास करताना अनेक अडथळ्यांचा सामना वाहनचालकांना करावा लागत आहे.
--------------------------
सुविधांना ग्रहण
विरार खानिवडे येथे टोल नाका असला तरी सुविधांचा बोजवारा उडाला आहे. तसेच महामार्गावर खड्डेमय रस्ते, सेवा रस्त्यांवर वाहने, आजूबाजूला अनधिकृत धाबे, वाहनांतून क्षमतेपेक्षा अधिक मालाची वाहतूक असे प्रकार होत आहे. तसेच महामार्गावर रस्ता दुभाजक असले तरी काही जण स्वतःच्या सोईसाठी तोडतात. यामुळे अपघातांत वाढ झाली आहे.
....
कोणतीच कार्यवाही नाही
१ बोईसरचे आमदार राजेश पाटील यांनी मनोर-चिंचोटी महामार्गाची दुरवस्था, रस्त्यांची दयनीय परिस्थिती याबाबत पावसाळी अधिवेशनात चिंता व्यक्त केली. अपघातात मृत्यू, जखमींची संख्या वाढत आहे. सरकारने राष्ट्रीय महामार्गाकडे लक्ष घालावे याबाबत मुद्दे मांडले. तसेच टोलनाका देखील बंद केला, मात्र अद्याप सुविधांबाबत कोणतीच कार्यवाही झाली नाही.
२ राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाला सोबत घेत जिल्हाधिकारी गोविंद बोडके, खासदार राजेंद्र गावित यांनी मनोर, खानिवडे टोलनाका, चिंचोटी, वसई, वरसावे पुलापर्यंत पाहणी केली. याठिकाणी निर्माण होणाऱ्या समस्या, अपघात प्रवण क्षेत्राचा आढावा घेतला; परंतु यावर तोडगा कधी निघणार व प्रवाशांचा प्रवास सुखकर कधी होणार, हे मात्र निश्चित नाही.
-------------------------------------
अपघात - ४५१
जखमी - ६१५
मृत्यू - ९८
....
मुंबई अहमदाबाद महामार्गाच्या चिंचोटी व मनोर भागाची पाहणी करण्यात आली आहे. या भागात कोणत्या सुविधा उपलब्ध नाही याचा आढावा घेण्यात आला असून नागरिकांना अधिकाधिक सुविधा देण्यासह समस्या सोडवण्यावर भर देण्यात येईल.
- सुरज सिंग, प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभाग
---
महामार्गावरून अवजड वाहनांतून जास्त क्षमतेने मालवाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. तसेच दोषी वाहनचालकांकडून दंड देखील उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून वसूल केला जात आहे. तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांची तपासणी करण्यात येत आहे.
- दशरथ वाघुले, अधिकारी, उपप्रादेशिक परिवहन विभाग