रेबीज लसीकरणासाठी स्थानिक डॉक्टरांची मदत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रेबीज लसीकरणासाठी स्थानिक डॉक्टरांची मदत
रेबीज लसीकरणासाठी स्थानिक डॉक्टरांची मदत

रेबीज लसीकरणासाठी स्थानिक डॉक्टरांची मदत

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : रेबीज लसीकरणासाठी पालिकेने आता स्थानिक प्राणी डॉक्टरांची मदत घेण्याचे ठरवले आहे. जागतिक रेबीज दिनाचे औचित्य साधून मुंबईतील जवळपास पाच हजार भटक्या श्वानांच्या रेबीजविरुद्घ लसीकरणासाठी पालिकेने मोहीम सुरू केली आहे. याअंतर्गत भटक्या श्वानांशी संबंधित सर्व माहिती संकलित करण्यासाठी ॲपचाही वापर करण्यात आला आहे. मात्र, ही सर्व प्रक्रिया ‘टेक्नोसॅवी’ असूनही प्रतिसाद कमी असल्याचे प्राणिमित्रांचे म्हणणे आहे.
२८ सप्टेंबरपासून ९ ऑक्टोबरपर्यंत सुमारे पाच हजार श्वानांचे लसीकरण करण्याचे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे. पालिकेच्या पशुवैद्यकीय आरोग्य विभागाने सोशल मीडियाद्वारे स्थानिक फीडर आणि प्राणी हक्क कार्यकर्त्यांशी संपर्क साधला. याअंतर्गत ३७५ हून अधिक गुगल फॉर्म स्थानिक फीडरकडून प्राप्त झाले आहेत, जे त्यांच्या परिसरात काम व सहकार्य करण्यासाठी तयार झाले आहेत. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी पशुवैद्यकीय विद्यार्थ्यांसह पालिकेचे सात अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत.
वरिष्ठ पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहा तातेलू यांनी सांगितले की, दररोज सरासरी ३५० लशी दिल्या जात आहेत. आतापर्यंत कांदिवली, बोरिवली, अंधेरी, माहीम, माटुंगा आणि धारावी येथे ही मोहीम राबवण्यात आली आहे.
मालाड पूर्वेकडील फिडर (जे श्वानांना खाणे देतात) मधू चंदना या पालिकेने राबवलेल्या या मोहिमेत सहभाग घेण्यासाठी उत्साही आहेत. दरम्यान, तंत्रज्ञानाची कमी जाण असलेले लोक या मोहिमेचा लाभ घेऊ शकत नाहीत. नाही तर माझ्या परिसरातील आणखी अनेक लोकांनी फॉर्म भरले असते, असेही त्या म्हणाल्या.

मोहिमेदरम्यान ॲपची चाचणी केली जाणार आहे. हे ॲप प्रश्नांनुसार श्वानाच्या आरोग्यासंबंधी सर्व माहिती गोळा करण्यासाठी उपयुक्त ठरेल. त्यात श्वानाचा फोटो, श्वानाची नसबंदी आणि त्याचे इतर आरोग्य मापदंड नोंद करण्याचा समावेश आहे.
– डॉ. के. ए. पठाण, महाव्यवस्थापक, महापालिका पशुवैद्यकीय आरोग्य विभाग

सोशल मीडियाद्वारे पालिकेशी संपर्क साधलेल्या सर्व फिडर्सची, तसेच मोहिमेदरम्यान अधिकाऱ्यांशी संपर्क साधलेल्या सर्वांची माहिती गोळा करण्यात आली आहे. आम्ही आमच्याकडे येण्यास उशीर झालेल्या फिडर्सशी संपर्क साधू; मात्र यापुढे येणाऱ्या फिडर्सना या मोहिमेत सामावून घेता येणार नाही. सध्या मोजक्याच फिडर्सना प्राधान्य दिले आहे. पुढच्या मोहिमेत इतर फिडर्सचा समावेश केला जाईल.
– डॉ. स्नेहा तातेलू, वरिष्ठ पशुवैद्यकीय अधिकारी