वृद्ध महिलेचे द्विपक्षीय फुफ्फुस प्रत्यारोपण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वृद्ध महिलेचे द्विपक्षीय फुफ्फुस प्रत्यारोपण
वृद्ध महिलेचे द्विपक्षीय फुफ्फुस प्रत्यारोपण

वृद्ध महिलेचे द्विपक्षीय फुफ्फुस प्रत्यारोपण

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. ३ : मुंबईतील ६४ वर्षीय महिलेचे एका खासगी रुग्णालयात यशस्वी फुप्फुस प्रत्यारोपण करण्यात आले. तिला अतिसंवेदनशील अशा न्यूमोनिटिस (इंटरस्टिशियल लंग डिसीज) या आजाराने ग्रासले होते. ज्यामुळे फुप्फुसावर डाग पडत होते. फुप्फुसांची कार्य करण्याची क्षमता मर्यादित झाली होती. १० ऑगस्ट रोजी तिला रुग्णालयातून अवयव उपलब्ध होऊन, त्याच दिवशी द्विपक्षीय ऑर्थोटोपिक फुप्फुसांचे प्रत्यारोपण झाले.

रुग्ण दक्षिण मुंबईतील काही घरांमध्ये घरकाम करत होती, जिथे तिला कबुतराची विष्ठा आणि पंखांनी भरलेल्या टेरेस आणि खिडक्या साफ कराव्या लागत असत. या कामामुळे तिच्या फुप्फुसांवर परिणाम झाला. त्या २०१९ पासून घरगुती ऑक्सिजन थेरपीवर होत्या. त्यानंतर फेब्रुवारी २०२२ मध्ये डॉ. चंद्रशेखर कुलकर्णी यांच्याकडे त्या उपचारासाठी दाखल झाल्या. तिच्या फुप्फुसांमध्ये लक्षणीय फायब्रोसिस होता. वजन फक्त ४० किलोग्रॅम झाले होते. या टप्प्यावर, द्विपक्षीय फुफ्फुस प्रत्यारोपण हा एकमेव पर्याय उपलब्ध होता. त्यांनी एप्रिल २०२२ मध्ये ‘झेडटीसीसी’मध्ये नोंदणी केली आणि तेव्हापासून ती योग्य दात्याची वाट पाहत होती. १० ऑगस्टला अखेर त्यांना फुप्फुस उपलब्ध झाले. प्रत्यारोपणानंतर आता त्या पूर्णपणे बऱ्या झाल्या आहेत.

न्यूमोनिटिस कसा होतो?
भारतात अतिसंवेदनशील न्यूमोनिटिस हा दुर्मिळ आजार असला तरी याचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळतात. या आजाराच्या निदानास अनेकदा विलंब होतो. वाढत्या शहरीकरणामुळे, वृक्षतोडीमुळे कबुतरे आणि इतर पक्षी इमारतींच्या गच्ची आणि विहिरींमध्ये घरटे बांधतात. त्यांच्या अधिक संपर्कात आल्याने स्थानिक रहिवाशांना न्यूमोनिटिस होण्याची शक्यता वाढते.

फुप्फुस हे असे एकमेव अवयव आहे जे बाहेरील वातावरणाच्या संपर्कात येते. रुग्णावर शस्त्रक्रिया यशस्वी झाली. त्यांना पूर्ववत होण्यास थोडा वेळ लागेल. फुफ्फुसाच्या स्थितीची प्रोटोकॉल बायोप्सी आणि इम्युनोसप्रेसिव्ह औषधांच्या पातळीचे बारकाईने निरीक्षण केले जाईल.
- डॉ. चंद्रशेखर कुलकर्णी, प्रमुख फुप्फुस प्रत्यारोपण सर्जन

अंतिम टप्प्यातील फुप्फुसाच्या आजारावर प्रत्यारोपणासारख्या पर्यायांचा विचार अनेकदा केला जात नाही. या महिलेला मुंबईत प्रत्यारोपणाचा पर्याय मिळाला. तिला आयसीयूमध्ये दीर्घकाळ राहावे लागले; परंतु व्यायाम आणि फिजिओथेरपीमुळे त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली.
- डॉ. समीर गर्दे, वरिष्ठ पल्मोनोलॉजिस्ट